Our MLA Harshwardhan Jadhav is doing good work now : Nitin Patil | Sarkarnama

आमचा आमदार हर्षवर्धन जाधव आता बरं काम करतोय : नितीन पाटील 

जगदीश पानसरे 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला राजीनामा, पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका, मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची केलेली मागणी यावरून ते स्वतःला कन्नड पुरतेच मर्यादित ठेवू इच्छित नाही, तर त्यांना खासदारकीचे वेध लागल्याची चर्चा कन्नडमध्ये सुरू झाली आहे. 
 

औरंगाबादः राजकारणा कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो अस नेहमीच बोलल जात. कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या बाबतीत हे खरे ठरू पाहत आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सर्वप्रथम हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. नितीन पाटलांनी देखील त्यांच्या या धाडसाच जाहीर कौतुक करत 'आमचा आमदार आता चांगल काम करतोय' अशा शब्दांत दाद दिली. यामुळे या दोघांची काही सेटिंग तर झाली नाही ना? अशी चर्चा कन्नड मतदारसंघात रंगायला सुरूवात झाली आहे. 

सकल मराठा मोर्चाच्या वतीने गुरुवारी  महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंद दरम्यान कन्नड येथे ठिय्या देत रास्ताराको करणाऱ्या आंदोलकांसमारे माजी आमदार नितीन पाटील यांनी छोटेखानी भाषणही केले. आगामी विधानसभा निवडणुक कॉंग्रेसकडून लढण्यास नितीन पाटील इच्छूक आहेत. 

त्यामुळे एकूणच मराठा आरक्षण त्यावरून त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली आक्रमक भूमिका यावर नितीन पाटील काय बोलतात याकडे आंदोलकांचे कान लागले होते. पण नितीन पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकले. 
 

राज्यात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वात पहिला राजीनामा आमच्या आमदारांनी दिला, त्यांनतर 30-32 जणांनी राजीनामे दिले पण त्याला काही महत्व नाही असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचे गुणगाण केले. त्याचा आम्हाला अभिमान आहे, आमचा आमदार आता बर काम करतोय अशी पुष्टीही नितीन पाटील यांनी जोडली. 

आमच काही सेटिंग नाही... 
नितीन पाटील यांच्या तोंडून हर्षवर्धन जाधव यांच कौतुक ऐकल्यानंतर जोशात आलेल्या तरूणांनी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांचा योग्य तो अर्थ लावत नितीन पाटील यांनी लगेच स्वतःला सावरले.  तुम्हाला वाटेल नितीन पाटील हे काय बोलतोय अस म्हणंत आमच काही सेटिंग नाही बर का? असा खुलासाही लगोलग केला. आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणारच आहे असेही स्पष्ट करत वेगळी चर्चा होऊ नये याची काळजी देखील घेतली. 

दरम्यान, आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला राजीनामा, पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका, मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची केलेली मागणी यावरून ते स्वतःला कन्नड पुरतेच मर्यादित ठेवू इच्छित नाही, तर त्यांना खासदारकीचे वेध लागल्याची चर्चा कन्नडमध्ये सुरू झाली आहे. 

खासदार व्हायचे असेल तर जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून एकगठ्ठा मत पदरात पाडून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधव आणि नितीन पाटील दोघे एकत्र आल्याचे देखील बोलले जाते. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा आणि नितीन पाटील यांनी कन्नड विधानसभा लढवायची असे ठरल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नितीन पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांची केलेली भलामण  अनेकांना खटकली. 

अर्थात नितीन पाटील यांनी आपण विधानसभा लढवणारच असे सांगून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला असला तरी याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. 

1999 च्या विधानसभा निवडणूकीत नितीन पाटील कॉंग्रेसकडून निवडून  गेले होते. त्यानंतर 2004 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी नितीन पाटील यांचा पराभव केला होता. तर 2009 आणि 2014 मध्ये कॉंग्रेसने नितीन पाटील यांना डावलून अनुक्रमे भरतसिंग राजपूत आणि नामदेव पवार यांना उमेदवारी दिली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख