Our Government will Remain for next Fifteen Years Claims Shambhuraje Desai | Sarkarnama

महाआघाडीचे सरकार पाच नव्हे 15 वर्षे टिकेल : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

महाविकास आघाडीचे आमचे सरकार पाच वर्षे नाही तर पुढचे 15 वर्षे टिकेलं असा विश्‍वास व्यक्त करून विरोधी पक्षाने याबाबत चिंता करू नये, असा टोला राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात लगावला.  

सातारा : महाविकास आघाडीचे आमचे सरकार पाच वर्षे नाही तर पुढचे 15 वर्षे टिकेलं असा विश्‍वास व्यक्त करून विरोधी पक्षाने याबाबत चिंता करू नये, असा टोला राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात लगावला.  सातार्‍याच्या पालकमंत्री पदाबाबत पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल, असे ही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीमधला जास्तीत जास्त निधी जिल्ह्यासाठी आणण्यासोबतच जिल्ह्याचे जे रखडलेले प्रश्‍न तातडीने पुर्ण करण्याला प्राधान्य राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शंभूराज देसाई जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. यावेळी शासकिय विश्रामगृह येथे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ''मला तिसर्‍या टर्म नंतर राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आहे. याबाबत  मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे मनापासून ऋण  व्यक्त करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळामध्ये काम करण्याची मला त्यांनी दिली आहे.''

महाविकासआघाडी बाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, ''शासन पाच वर्षे नाही तर पुढचे 15 वर्षे टिकेलं असा विश्‍वास व्यक्त करून विरोधी पक्षाने याबाबत चिंता करू नये,'' सातार्‍याच्या पालकमंत्री पदाबाबत आपली काय भूमिका  राहिल यावर ते म्हणाले, पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. जिल्ह्याची पार्श्‍वभुमी पाहता बहुतांश तालुक्याची भौगोलिक रचना डोंगरी, दुर्गम, व दुष्काळग्रस्त स्वरूपाची आहे. यांच्याकरिता वेगवेगळ्या योजनांमधून अधिकचा निधी उपलब्ध करून आणण्यास माझे प्रथम प्राधान्य राहिल. तसेच जिल्हा नियोजनाचा आराखडा वाढवून घेण्याचा विचार असून त्यासाठी देखील निधी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"माझे आजोबा स्वर्गीय लोकसेवक बाळासाहेब देसाई यांचा मला वारसा लाभला आहे. साहेबांनी करारी मंत्री, करारी लोकप्रतिनिधी, आणि ज्या विभागाचे व ज्या खात्याचे त्यांनी कामकाज केले तेथे कामाचा ठसा त्यांनी उमटवला त्याच प्रमाणे निश्‍चितच तोच विचार व आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचसोबत  उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारी प्रमाणे प्रभावी काम करण्याचा माझा विचार राहिल." असेही त्यांनी सांगितले

''पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबल्या तर बाळासाहेब पाटील व मी दोघांच्या विचार विनिमयाने जिल्ह्याला जास्तीचा निधी आणण्यासाठी प्रयत्न असेल.  मेडिकल कॉलेजच्या प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात  मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत  बैठक घेवून हा प्रश्‍न तातडीने सोडवण्यावर भर दिला जाईल.  मला राज्यमंत्री म्हणून पूर्ण राज्याची जबाबदारी आहे. शेवटी कुठलाही लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात लक्ष देतो, त्याप्रमाणे मतदारसंघात आणि जिल्ह्यात व राज्यात ही काम करणार आहे.. आता खातेवाटप होऊदेत जिल्ह्यात बदल व प्रभावी  काम नक्की दिसेल,''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख