Osamanabad Z.P. elections : changed political equations creating problems | Sarkarnama

राजकीय समीकरणे बदलल्याने सभापती निवडीचा पेच

तानाजी जाधवर 
बुधवार, 15 जानेवारी 2020

 शुक्रवारी (ता.17) सभापतीच्या निवडी होणार असून, सत्ताधारी गटाचे सदस्य सध्या सहलीवर गेले आहेत.

उस्मानाबाद :  जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. परिणामी सभापती निवडी करताना नवीन आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे. बांधकाम, कृषी, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाच्या सभापतींसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, कोणाला संधी द्यायची असा मोठा पेच सत्ताधाऱ्यात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

 शुक्रवारी (ता.17) सभापतीच्या निवडी होणार असून, सत्ताधारी गटाचे सदस्य सध्या सहलीवर गेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता कांबळे या राष्ट्रवादीच्या बंडखोर व उपाध्यक्षपदी शिवसेनेचे बंडखोर धनंजय सावंत यांची निवड झाल्यानंतर राजकीय समीकरण बदलले आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर, भाजपच्या चिन्हावर आलेले सदस्य व शिवसेनेचे बंडखोर या सर्वांना नवीन सभापती निवडीत स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे. बांधकाम सभापतीपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. तुळजापुर मतदारसंघाला अध्यक्षपद मिळाले असून, परंडा मतदारसंघाचे उपाध्यक्ष बनल्याने आता इतर मतदारसंघाला संधी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बांधकाम समितीच्या सभापतीसाठी राजकुमार पाटील, संदीप मडके, दत्तात्रय देवळकर यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांना सभापती पद मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांना नेमके कोणते सभापती दिले जाणार याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पहिल्या टर्ममध्येही तीन सभापती तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इतर पक्षातील सदस्यांना देऊ केले होते. आताही तशीच काहीशी स्थिती असल्याचे दिसून येत आहे. तर महिला व बालकल्याण समितीसाठी महिला सदस्यांमध्ये चढाओढ आहे. समाजकल्याण समितीच्या सभापतीसाठी दिग्विजय शिंदे, ज्ञानदेव राजगूरु व शेखर घंटे हे इच्छुक आहेत. कृषी समितीचे सभापती सावंत गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास दत्ता साळुंखे यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

संधी देताना नेतृत्वाचा कस लागणार
भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना गेल्यावेळी दोन सभापतीपद मिळाले होते. त्यातही बांधकाम सभापतीसारखे महत्वाचे पद त्यांना दिलेले होते. यावेळी मात्र तसे काही होईल याची शक्‍यता कमीच असल्याचे दिसत आहे. एकुणच बदलेल्या समीकरणामध्ये सभापती निवडी करताना नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार, हे मात्र निश्‍चित आहे. प्रत्येक गटाचा सभापती पदावर दावा असल्याने अशावेळी कोणाला संधी द्यायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख