चंद्रकांत पाटलांचे साडीवापट विरोधकांच्या रडारवर : पुणेकरांकडून टोमणे

पुणेकर महिलांचा अवमान केल्याने चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
चंद्रकांत पाटलांचे साडीवापट विरोधकांच्या रडारवर : पुणेकरांकडून टोमणे

पुणे : कोथरूडमधील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याच्या भूमिकेवरून कोथरूडचे आमदार
चंद्रकांत पाटील आता विरोधकांच्या रडारवर आले आहेत. याच मुद्यावरून "मनसे'पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाटील यांचा निषेध करीत, आंदोलनाचा पवित्रा घेतला. अशा प्रकारे साड्या वाटण्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने "चंपा साडी सेंटर'चे प्रतीकात्मक उद्‌घाटन केले. दरम्यान, महिलांना साड्या वाटण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारीही साड्यांचे वाटप केले.

पूरग्रस्तांना पाटील यांनी मदत केली नाही. मात्र, पुणेकर महिलांना गरज नसतानाही ते साड्या का वाटप करीत आहेत, अशी विचारणा मनसे आणि आपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर साड्या वाटू देणार नाही, असा इशारा मनसेचे किशोर शिंदे यांनी दिला. तेव्हा काही नगरसेवकांनी आपापल्या भागातील महिलांना साड्यांचे वाटप केले.

राजकीय पक्षांचा विरोध वाढत असूनही, साड्यांचे वाटप करण्यावर पाटील ठाम राहिले. त्यानंतर मात्र, साड्या वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजत राहिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत, "चंपा साडी सेंटर'चे उद्‌घाटन करण्यात आले. पुणेकर महिलांचा अवमान केल्याने पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

मनसेचा विरोध

कोल्हापूर आणि पुण्यातील पूरग्रस्त महिलांना साड्यांसह अनेक गृहोपयोगी वस्तूंची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत पाटील आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक कोथरूडमध्ये नवीन पायंडा पाडत असल्याचा आरोप मनसेचे विभागप्रमुख सुधीर धावडे यांनी केला. त्यानंतर साड्या वाटू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पाटील यांच्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करणार आहे, असेही धावडे यांनी सांगितले. दरम्यान, मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आपचे शहराध्यक्ष मुकुंद कीर्दत यांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.

वाटपावरून पुणेरी टोला

राजकीय पक्षांच्या आधीच पुणेकर विशेषतः कोथरूडकरांनीही साड्या वाटण्यावरून पाटील यांना पुणेरी टोमणे मारले.
"एकाच सोसायटीत एकाच रंगाच्या साड्या नको; कारण, महिलांमध्ये वाद होतील.'
"साडी देताना दुपारच्या वेळेत दरवाजा उघडला नाही तर साडी दारावरच्या पिशवीत ठेवावी.'
"साडीवर कोणाचाही फोटो किंवा पक्षाचे चिन्ह नसावे, ते असल्यास ड्रायक्‍लिनचा खर्चही द्यावा लागेल.'
"मागण्यांकडे काणाडोळा केला तर पुढच्या खेपेला मत मिळणार नाही.' आदी टोमणे सोशल मीडियावरही व्हायरल झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com