opposition parties in pune boycott modi`s function | Sarkarnama

पुण्यात मोदींच्या कार्यक्रमावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेनेचाही बहिष्कार!

अमोल कविटकर
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमावर राष्ट्रवादी आणि काँग्रेससह शिवसेनेनेही बहिष्कार घातला आहे. मेट्रोच्या भूमिपूजनाचे निमित्त असले तरी ही भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सभा आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना कोणताही योग्य मुद्दा नसल्याने हा बहिष्काराचा ढोंगीपणा सुरु आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत असलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचाही आरोप होत आहे. निमंत्रण पत्रिकेतून महापौरांचे नाव नसल्याचा मुद्दा सेनेचे लावून धरला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, "खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वंदना चव्हाण यांना या कार्यक्रमात सन्मानपूर्वक सहभागी करुन घेतले गेले नाही.  मोदी हे महिलांना सन्मानजनक वागणूक देण्याची भाषा करतात, मात्र प्रत्यक्षात कृतीतून तशी वागणूक दोन्ही खासदारांना दिली गेलेली नाही. शिवाय हा कार्यक्रम मेट्रो भूमिपूजनाचा असला तरी ही  भाजपची ही प्रचार सभा आहे, त्यामुळे आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही".

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, "पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत मेट्रो तीनचा विषय मंजूर करण्याआधीच या कार्यक्रमाचे नियोजन केले गेले आणि सोमवारी गोंधळात हा विषय मंजूर केला गेला. यातील त्रुटी आणि सूचना यावर सविस्तर चर्चा अपेक्षित असताना केवळ संख्याबळाच्या आधारावर हा रेटून नेला".

सेनेने बहिष्कारासाठी मात्र माहापौरांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचा मुद्दा पुढे केला आहे. सेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले, "प्रोटोकॉलप्रमाणे महापौरांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. हा मुद्दा आम्ही सभागृहातदेखील उपस्थित केला होता.``

तीनही पक्षांकडून बहिष्कारासाठी वेगवेगळी कारणे दिली गेली गेली आहेत, यावर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, "निवडणुका तोंडावर आहेत, विरोधकांकडे कोणताही मुद्दा उरलेला नसल्याने विरोधकाकांडून बहिष्काराची ढोंगबाजी सुरु आहे. विरोधक सातत्याने भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. हा प्रकार म्हणजे पुणेकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रकार आहे"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख