दिल्ली दंगलीबद्दल विरोधकांचे राज्यसभेत भाजपवर घणाघाती आरोप

कोण काय म्हणाले आनंद शर्मा (कॉंग्रेस) देशात लष्कर असताना राम सेना, हिंदू सेना अशा अवैध सेनांवर या सरकारने त्वरित बंदी घालावी. दिल्लीत गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचीही चौकशी व्हावी.विजय गोयल (भाजप) - दुर्देवाने चर्चेत अशी भाषणे झाली की परिस्थिती निवळण्याऐवजी आणखी चिघळावी.भूपेंद्र यादव (भाजप) - दंगलीसाठी जी वेळ निवडली व मुसलमानांच्या मनात भिती निर्माण करण्याचा कट रचणाऱयांची तयारी पूर्ण होती. सरकार सत्य प्रकाशात आणून अफवांचा बाजार पसरविणाऱयांना व दंगल करणाऱयांना सरकार सोडणार नाही.तिरूची सिवा (द्रमुक) - राजधानीतील दंगलीवर साधी चर्चा व्हावी यासाठी लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांना सात दिवस लढाई करावी लागणे दुर्देवी आहे.डेरेक ओब्रायन (तृणमूल कॉंग्रेस) - देशाचे होम मिनिस्टर ह्युम्रनिटी मिनीस्टरही असावेत.प्रसन्न आचार्य (बीजेडी) - महात्मा गांधींच्या भारतात पुन्हा असे दंगे होणार नाहीत याची जबाबदारी या सरकारची आहे.ई. करीम (माकप) -दिल्ली दंगल हे सरकारपुरस्कृत दंगलीचे पीपीपी मॉडेल होते. दिल्ली दंगल व गुजरात दंगलीचे आर्किटेक्‍ट असणारे दोन चेहरे तेच व एकसारखेच आहेत.नरेश गुजराल (अकाली दल) - विकासासाठी शांतता ही मूलभूत अट आहे हे साऱ्यांनीच लक्षात ठेवावे.
दिल्ली दंगलीबद्दल विरोधकांचे राज्यसभेत भाजपवर घणाघाती आरोप

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली न्यायालयीन चौकशी करण्याची जोरदार मागणी राज्यसभेत आज झालेल्या वादळी चर्चेत कॉंग्रेससह विरोधकांनी केली. ही दंगल भाजपने घडविल्यामुळे गृहमंत्री 25 दिवस उलटले तरी दंगलपीडीतांना भेटण्यास गेले नाहीत असा आरोप आपचे संजय सिंह यांनी शहा यांच्या तोंडावरच केला. ही दंगल म्हणजे भाजपने दिल्लीकरांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक व व्हायरस हल्ला असल्याचा ठपका कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांनी ठेवला. दिल्लीत माओवादी व जिहादींनी आणि आझादीचा नारा दिल्याचा आरोप भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी केला. 

दिल्लीतील कायदा सुव्यवस्था परिस्थतीवर झालेल्या चर्चेत अनेक वक्‍त्यांचा वेळ दिल्ली यापुढे शांत कशी राहील यापेक्षाही परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच खर्ची पडला. आरोप प्रत्यारोप थांबवा असे कळकळीचे आवाहन करणारे अब्दुल वहाब, आनंद शर्मा व त्रिवेदी यांच्यासारखे निवडक नेते असल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर मुस्लिम नेत्यांची भाषणे वाचून दाखविण्यासच सुरवात केल्यावर वातावरण पुन्हा गरम झाले. 

सिब्बल यांनी चर्चेला सुरवात करताना, भाजप मंत्री व नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करून दंगलीचा व्हायरस पसरविल्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले की पोलिसांना दंगल आटोक्‍यात न आणण्याचा इशारा कोणीतरी दिला होता काय. दिल्ली दंगलीत जळत होती तेव्हा पंतप्रधान मोदी व शहा ट्रम्प यांच्या स्वागताच्या इव्हेंटमध्ये मग्न होते. दंगलीच्या काळात केंद्रातर्फे एकही निवेदन आले नाही पण मोदींना वक्तव्य देण्यासाठी 70 तास उलटावे लागले. हे सरकार गायीचा जीव वाचविण्यासाठी फार जागरूक आहे. आता माणसाचा जीवही तेवढाच मोलाचा असल्याचे पटविण्यासठी संसदेला घटनादुरूस्ती करावी लागेल का. जो व्हायरस तुम्ही पसरविता त्याचा उपायही आम्ही आहोत असेही सिब्बल म्हणाले .

त्रिवेदी यांनी आपल्या काव्यात्मक भाषणात सीएए कायदा मंजूर झाल्यावर 72 दिवस जी आग दिल्लीत लावली गेली ती दिल्ली पोलिसांनी 36 तासांत विझवली असा टोला कॉंग्रेसला लगावला. ते म्हणाले की 100 हून जास्त लोकांचे प्राण गेले असे 17 दंगे ज्या कॉंग्रेसच्या शासनकाळात झाले ते सारे धर्मनिरपेक्ष होते व 2002 सारखी एखादी दंगल धर्मांध, ही मानसिकताच घातक आहे. हिंसा हा व्हायरस असेल तर त्याचे मूळ कॉंग्रेस नेतृत्वाच्याच भाषणात तुम्हाला सापडेल. एखाद्या विदेशी राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्याच्या वेळीच दंगल भडविण्याचे कारस्थान देशात प्रथमच रचले व पार पाडले गेले असा त्यांनी आरोप केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com