opposition aggressive in assembly | Sarkarnama

कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक ,विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

ब्रह्मदेव चट्टे : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज बुडवून लंडनमध्ये मजा मारतो.  मग शेतकऱ्यांनीच कोणते पाप केले आहे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

मुंबई:विधानसभेच्या कामाकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षाकडून नियम 57 अन्वये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधक प्रचंड अक्रमक होत घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. यामुळे सभाग्रहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभाग्रहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह, सत्ताधारी शिवसेनेची कर्जमाफीची मागणी असताना, मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेवू असे सांगत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सगळे शेतकरी वरती गेल्यानंतर कर्जमाफी करणार का ? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला.

आज विधानसभेचे कामाकाज सुरू होताच प्रश्नउत्तराच्या तासादरम्यान विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्याय नसताना सरकार गंभिरपणे भूमिका घ्यायला तयार नसल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. विखे पाटील यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या "सामना" दैनिकाच्या आग्रलेखाचा आधार घेत सत्ताधारी शिवसेनेचीही कर्जमाफी करण्याची मागणी असल्याचे सभाग्रहाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सरकार मूग गिळून का गप्पं आहे हे समजत नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. 

जाहीरातींसाठी उधळपट्टी आणि उद्योगपतींची कोट्यावधींची कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात आहे. ताबडतोब शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे सांगत विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. कामकाज चालवणे अशक्य झाल्याने दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकुब करुन दिवसभराचे काम स्थगित करण्यात आले. 

सरकारने जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा, असे सांगत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर थेट हल्ला केला. अजित पवार म्हणाले, रोज १०-१२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. ऊस, सोयाबीन, तुरीसह फळबागा आणि सर्वच शेतमालाचे वाटोळे सरकारच्या धोरणामुळे झाले आहे. जाहीरातींवर हजारो कोटींची उधळपट्टी सुरु आहे. उद्योगपतींनाही हजारो कोटींची माफी मिळते. उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज बुडवून लंडनमध्ये मजा मारतो.  मग शेतकऱ्यांनीच कोणते पाप केले आहे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

विधानसभेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शिवसनेसह १५० पेक्षा जास्त आमदार कर्जमाफीची मागणी करत आहेत. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. त्यामुळे बहुमताचा आदर करुन ताबडतोब कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. विरोधात असताना आरोप करणारे आता मंत्र्यांना आता लाल दिव्याची उब लागली आहे.शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार दळभद्री आहे, असा घणाघात त्यांनी केला.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी कामकाज पुढे पुकारले. त्यावर विरोधी सदस्यांनी कर्जमाफी झालीच पाहीजे अशा घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणा दिल्या आणि कागदपत्रे अध्यक्षांच्या दिशेने भिरकारली.  प्रचंड गदारोळ वाढून कामकाज चालवणे अशक्य झाल्याने सुरवातील १५ मिनीटे आणि त्यानंतर १२ वाजेपर्यंत कामकाज तहकुब करण्यात आले. 

त्यानंतरही कामकाज सुरु झाल्या गदारोळ कमी झाला नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषीमंत्री फुंडकर यांनी योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल असे सांगुनही विरोधक शांत झाले नाहीत. शेवटी तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख