बेळगाव PLD बँक संघर्षातून जन्मले होते 'ऑपरेशन कमळ'  

या संघर्षात कॉंग्रेसचे राज्यस्तरीय नेते डी. के. शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांना बळ दिल्याचा आरोप जारकीहोळी यांनी केला.
बेळगाव PLD बँक संघर्षातून जन्मले होते 'ऑपरेशन कमळ'  

बेळगाव : गेल्या सव्वा वर्षापासून कर्नाटकात सुरु असलेले राजकीय नाट्य पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संपले. तर राज्यातील भाजप सरकारही तरले आहे. पोटनिवडणुकीनंतर आता भाजपचे संख्याबळ 118 झाले आहे. पक्षांतर्गत नाराजी टळली तर भाजपला पुढील साडेतीन वर्षे राज्याची सत्ता निर्धोकपणे चालविता येणार आहे.

सव्वा वर्षापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील पीएलडी बॅंकेच्या निवडणुकीवेळी या नाट्याला सुरवात झाली होती. त्या निवडणुकीत माजी मंत्री रमेश जारकीहोळी व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. त्यात हेब्बाळकर यांनी बाजी मारुन समर्थक महादेव पाटील यांना बॅंकेचे अध्यक्ष केले. या संघर्षात कॉंग्रेसचे राज्यस्तरीय नेते डी. के. शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांना बळ दिल्याचा आरोप जारकीहोळी यांनी केला. त्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्वावर आरोप करण्यास सुरवात केली. त्यावेळी रमेश यांच्याकडे मंत्रीपद होते. पण, त्यांचे मंत्रीपद काढून घेऊन ते त्यांचे बंधू सतीश यांना देण्यात आले. त्यामुळे रमेश यांनी जाहीरपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरवात केली. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी यांना आतून रसद पुरविली. त्यानंतर रमेश यांनी नाराज कॉंग्रेस आमदारांची मोट बांधली. धजदच्या नाराज आमदारांना सोबत घेतले. या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी राजीनामे देऊन राज्यातील धजद व कॉंग्रेसच्या युती सरकारला सुरुंग लावला. त्यामुळे, एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असलेले युती सरकार अल्पमतात आले.

कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. जुलैमध्ये झालेला विश्‍वासदर्शक ठराव त्यांना जिंकता आला नाही. त्याचवेळी बंडखोरी केलेल्या व राजीनामे दिलेल्या कॉंग्रेस व धजदच्या 17 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय तत्कालीन विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी दिला. त्या विरोधात या सतरा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यानच्या काळात 106 आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार सत्तेत आले. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोगाने 17 पैकी 15 जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळीच ही पोटनिवडणूक होणार होती. अपात्र आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पोटनिवडणुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे, पोटनिवडणुकीचे नवे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले. या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांना पोटनिवडणूक लढविण्याची संधी दिली. त्यापैकी रोशन बेग वगळता सर्वांना भाजपने उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपने 15 पैकी 12 जागा जिंकल्याने येडियुराप्पा यांचे सरकार तरले असून सव्वा वर्षांपासून सुरु असलेले राजकीय नाट्यही संपले आहे.

2018 ची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच भाजपने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या होत्या. बहुमत नसतानाही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला व राज्यपालांनीही त्यांना संधी दिली. त्यावेळीही भाजपने 'ऑपरेशन कमळ' सुरू केले होते. पण, कॉंग्रेस व धजदचे आमदार त्यांच्या गळाला लागले नाहीत. त्यामुळे, येडियुराप्पा यांना आठवडाभरातच राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर कॉंग्रेस व धजदने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. पण, कॉंग्रेसमधील गटबाजी, मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या आमदारांतील असंतोषाला भाजपने खतपाणी घातले. त्यातून नव्याने "ऑपरेशन कमळ' सुरु झाले. यावेळी कॉंग्रेस व धजदचे आमदार भाजपच्या गळाला लागले व त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com