कर्नाटकात ऑपरेशन 'कमळ' सुरु; काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग यांचे  राजीनामे 

मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे कॉंग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. सोमवारी (ता.1) सकाळी होसपेठचे आमदार आनंदसिंग यांनी तर, दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्यापर्यंत कॉंग्रेस व धजदचे 11 आमदार राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळीत चर्चा आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनीही सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
कर्नाटकात ऑपरेशन 'कमळ' सुरु; काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग यांचे  राजीनामे 

बंगळूर : मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे कॉंग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. सोमवारी (ता.1) सकाळी होसपेठचे आमदार आनंदसिंग यांनी तर, दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्यापर्यंत कॉंग्रेस व धजदचे 11 आमदार राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळीत चर्चा आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनीही सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

आमदार आनंदसिंग यांनी विधानसभाध्यक्षांकडे आमदारपदाचा राजानामा दिला आहे. युती सरकारच्या जिंदाल कंपनीला जागा देण्याच्या धोरणाला आपला विरोध आसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सभाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला आहे. आपण स्वेच्छेना राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे. जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेल्याचे समजते.

रमेश जारकीहोळी व आनंदसिंग यांनी राजीनाम्याचे दिलेले कारण खरे नसून ते दोघेही ऑपरेशन कमळच्या जाळ्यात अडकले असल्याचे समजते. असंतुष्ट आमदारांनी टप्याटप्याने राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. आज रात्रीपर्यंत 9 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असून आणखी सहा आमदार उद्यापर्यंत राजीनामा देण्याची शक्‍यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

आनंदसिंग व जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसचे असंतुष्ट आमदार भीमा नाईक, प्रतापगौड पाटील, अमरेगौडा बय्यापूर यांच्यासह आणखी काही असंतुष्ट आमदारांचे बंगळूरात आगमन झाले आहे. राजीनामे देण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांत धजदच्या दोन आमदारांचा समावेश असल्याचे समजते. धजदचे यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार अचानक गायब झाल्याचे वृत्त आहे. बी. सी. पाटील (हिरेकेरुर), महेश कुमठळ्ळी (अथणी), श्रीमंत पाटील (कागवाड), जे. एन. गणेश (कंप्ली), नारायण गौड (के. आर. पेठ), बी नागेंद्र (बळ्ळारी ग्रामीण), हिरेपट्टणचे धजद आमदार महादेव यांचा संतुष्ट आमदारांत समावेश असून ते कोणत्याही वेळी राजीनामा देण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. धजदचे मावळते प्रदेशाध्यक्ष एच. विश्वनाथ नाराज असून ते ऐनवेळी राजीनामा देताल, असे सांगण्यात येते. मात्र या राजीनामा सत्राचे आपण मास्टरमाईंड नसल्याचे त्यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले.
सरकार वाचविण्याचा प्रयत्न

आनंद सिंग व जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तातडीने विधिमंडळ पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या निवासस्थानी धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनीही तातडीने सिध्दरामय्या यांचे निवासस्थान गाठले व नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. सरकार वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेता येतील, यावर सायंकाळपर्यंत चर्चा सुरू होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. यासाठी पक्षनिष्ठ व वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे घेऊन असंतुष्टाना संधी देण्यावर सर्वांचे एकमत झाल्याचे समजते.

दरम्यान, कॉंग्रेस हायकमांडने ही बाब गांभीर्याने घेतली असून कॉंग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांना तातडीने अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. वेणुगोपाल उद्या बंगळूरला येणार आहेत. सरकार वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याच्या सूचना कॉंग्रेस हायकमांडने वेणुगोपाल यांना केल्या आहेत.

कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील कॉंग्रेसबरोबर
बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे असंतुष्ट आमदार महेश कुमठळ्ळी म्हणाले, "आनंदसिंग किंवा रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. मी सरकारच्या कार्यावर असंतुष्ट आहे, हे खरे आहे. परंतु सध्या कॉंग्रेस टीम सोबत आहे. माझ्या मतदार संघाचा विकास मला महत्वाचा आहे. कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनीही आपण कॉंग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे अमेरिकेतून प्रयत्न
मुख्यमंत्री कुमारस्वामी खासगी दौऱ्यावर अमेरिकेला गेले आहेत. राज्यातील राजकीय हालचाली समजताच त्यांनी तेथूनच सरकार वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अमेरिकेतूनच त्यांनी असंतुष्ट आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधला आहे. राजीनामा देण्याची घाई करू नका. मी अमेरिकेहून येण्याची प्रतीक्षा करा. तोपर्यंत शांत राहा. तुमच्या समस्यांचा जरूर विचार करू, असे आवाहन त्यांनी केले आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमेरिकेतील आपला दौरा अर्धवट सोडून चार जुलैला भारतात परतणार असल्याचे समजते.

सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्य संख्या 224
कॉंग्रेस 79- (2 राजीनामे) = 77
धजद 37
भाजप 105
बसपा 01
अपक्ष 02

राज्यातील युती सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे दिवास्वप्न आहे. त्यात त्यांना यश येणार नाही. अमेरिकेतील कालभैरवेश्वर देवस्थानच्या भुमीपूजनासाठी मी आलो आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर माझे लक्ष आहे.
-एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री (ट्‌विटरवरून)

युती सरकारचे पतन होणार नाही. असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. - उपमुख्यमंत्री डी परमेश्वर

आनंदसिंग याच्यां राजीनाम्याचे वृत्त ऐकूण धक्का बसला. त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु संपर्क होत नाही. जिंदालप्रश्न हा वयक्तीक नाही. शासकीय पातळीवर तो सोडिण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारला धोका नाही. ही तात्पुरती समस्या आहे. ती लवकरच दूर होईल - मंत्री डी. के. शिवकुमार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com