'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन क्लास सुरू  - Online Classes Started for ITI Students Across Maharshtra Due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन क्लास सुरू 

ब्रिजमोहन पाटील
सोमवार, 13 एप्रिल 2020

'कोरोना' लाॅकडाऊनमुळे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना  रोज दोन तास प्राध्यापकांनी आॅनलाईन शिकवावे तसेच त्यांच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत

पुणे  : 'कोरोना' लाॅकडाऊनमुळे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना  रोज दोन तास प्राध्यापकांनी आॅनलाईन शिकवावे तसेच त्यांच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. सध्या रोज ३८६ आयटीआय मध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे. 

पारंपरिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाप्रमाणेच 'आयटीआय' मधील विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके आणि सैद्धांतिक विषयांचे मार्गदर्शन ऑनलाइन मिळणार आहे. व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या 'लर्निंग मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम'च्या माध्यमातून अभ्यास साहित्य निर्माण केले आहे. 

'वर्कशॉप कॅल्क्यूलेशन', 'वर्कशॉप सायन्स', 'इंजिनिअरिंग ड्रॉइंग', 'एम्प्लॉयबिलिटी स्किल्स', 'फिटर', 'टर्नर' या विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षकांनी त्याचा वापर करून आणि व्हिडीओ कॉलिंग प्रणालींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घ्याव्यात, अशा सूचना संचालनालयाने दिल्या आहेत. विभागाने युट्यूब चॅनेल तयार केले असून, त्यावरही विविध विषयांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रत्येक विषयांचे रोज किमान दोन तास ऑनलाइन वर्ग भरवणे संचालनालयाने बंधनकारक केले आहे. राज्यात ४१७ शासकीय 'आयटीआय' संस्था आहेत. त्यापैकी ३८६ संस्थांमध्ये आॅनलाईन शिक्षण व प्रशिक्षण याची व्यवसाय झाली आहे. तर ३१ ठिकाणी झालेली नाही.

विभाग आणि आॅनलाईन क्लाससाठी जोडलेले आयटीआय

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


विभाग आयटीआय संख्या आॅनलाईन जोडलेल्या संस्था
अमरावती ६३  ६१
औरंगाबाद  ८२ ८१
मुंबई  ६७ ५७
नागपूर  ७६ ७०
नाशिक ६८ ६३
पुणे ६१ ५४
एकुण  ४१७ ३८६