officers present at bjp meeting called by bala bhegade | Sarkarnama

पराभूत होऊनही माजी राज्यमंत्र्याच्या दिमतीला प्रशासन; भाजपच्या बैठकीला अधिकारी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

मावळ तालुक्यातील राजकीय चित्र बदलल्याने येथे राजकीय वादही वाढले आहेत. 

तळेगाव दाभाडे : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी येथील एका खासगी हॉटेलच्या सभागृहात भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, विशेष म्हणजे या बैठकीला तळेगाव नगर परिषदेचे अधिकारी राज्यमंत्र्यांच्या दिमतीला व्यासपीठावर उपस्थित होते. याबाबत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया देण्यात येत असून, मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत.

नगर परिषदेतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला माजी राज्यमंत्री भेगडे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, विधानसभेचे तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड आदींसह पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेतील अधिकारी उपस्थित होते.

कामांच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन प्रलंबित असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना भेगडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत कामांच्या तांत्रिक अडचणी, निधीची उपलब्धता, कामांसाठी लागणारा वेळ याबाबत माहिती देण्यात आल्याचे मुख्याधिकारी झिंजाड यांनी सांगितले. ही बैठक पक्षीय की नगराध्यक्षांनी बोलाविली असल्याचे सांगितले. पक्षीय पदाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त आयोजन केले काय? या बाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

शहराध्यक्ष दाभाडे म्हणाले, ""पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आम्ही माजी मंत्री बाळा भेगडे यांची भटे घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा आढावा बैठकीत आम्हाला बसण्याची विनंती केल्यामुळे बसलो. मात्र, नगर परिषदेच्या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर कसे? याबाबत ते निरुत्तर झाले.

नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते गणेश खांडगे म्हणाले, ""बैठकीच्या आयोजनाबाबत नगर परिषदेकडून अधिकृत निमंत्रण अथवा लेखी पत्र नव्हते. त्यामुळे नेमकी कोणी व कशासाठी बैठक आयोजित केली, याबाबत साशंकता होती, म्हणून बैठकीला गेलो नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख