मंत्र्यांचे पी. ए .होण्यासाठी अधिकाऱ्यांची जोरदार फिल्डिंग 

अनेक अधिकारी-कर्मचारी मंत्रीकार्यालयात काम केल्याच्या बळावर पुढे सार्वजनिक राजकीय जिवनात उतरून आमदार, खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे मंत्रीकार्यालयात काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकार-यात जोरदार स्पर्धा असते.
Mantralay
Mantralay

मुंबई  :  मंत्र्यांचे पी. ए . ( पर्सनल असिस्टंट ) होण्यासाठी अधिकाऱ्यांची जोरदार  फिल्डिंग सध्या सुरु आहे. मंत्र्यांच्या सेवेत सहायक म्हणून काम मिळवायचे आणि स्वतःचे 'कोट'कल्याण करून घ्यायचे या जिद्दीने पेटलेले अनेक अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत आहे . 


शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तार उरकल्यानंतर नुतन मंत्र्यांच्या  कार्यालयात 'सेवा' करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. 


  कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे पीएस म्हणून काम करण्यासाठी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यापासून ते दिल्लीतील कॉंग्रेसच्या प्रभावी नेत्यांमार्फत फोन करण्यास सुरूवात केली आहे.


 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्‍वासू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.


 तर निष्टावान शिवसैनिकांसह मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यापासून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत अधिका-यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

 मंत्रीकार्यालयात काम करण्यासाठी आपणच कसे सरस आहोत हे आपल्या मध्यस्थामार्फत नुतन मंत्रयांच्या कानावर घालतानाच बायोडेटयांच्या कागदासह या अधिकारी-कर्मचारी यांनी मंत्रयांच्या आगेमागे लगबग सुरू केल्याचे चित्र मंत्रालयात पहावयास मिळत आहे.


मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह तीन पक्षाच्या प्रत्येकी दोन मंत्रयांचे शपथविधी झाले. त्यानंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्रयांचा शपथविधी पार पाडला. मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री कार्यालयात खासगी सचिव म्हणजे पीएस, विशेष कार्यकारी अधिकारी, स्वीय सहायक म्हणजे पीए, निवासस्थानी असणारे स्वीय सहायक, वाहन चालक, सुरक्षा अधिकारी असा प्रत्येक मंत्रीकार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांचा फौजफाटा असतो. 

जनतेशी निगडीत प्रश्‍नांशी लोकप्रतिनिधी म्हणून सोडवणूक करताना मुख्यमंत्री कार्यालय असो की मंत्री कार्यालय असो, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आपली जबाबदारी निभावत असतात. मंत्री प्रशासकीय अधिका-यांच्या सल्ल्यांने कारभार पहात असतात. हा शिरस्ता आहे. 


मंत्रीकार्यालयात काम करण्यास संधी मिळणे हा तसा अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवेतील सन्मानाचा आणि कर्तव्यक्षमता सिद्ध करण्याचा कालावधी असतो.मंत्रीकार्यालयात काम करताना अनेक आव्हानात्मक प्रसंगांना देखील सामोरे जावे लागते. 


अनेक अधिकारी-कर्मचारी मंत्रीकार्यालयात काम केल्याच्या बळावर पुढे सार्वजनिक राजकीय जिवनात उतरून आमदार, खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे मंत्रीकार्यालयात काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकार-यात जोरदार स्पर्धा असते. 


साहजिकच या ठिकाणी काम करण्यासाठी मंत्रालयातील कक्षाधिका-यापासून ते महसूल विभागातील अनुभवी उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यत तसेच राज्यातील सर्व प्रकारच्या सरकारी सेवेतील अधिकारी 'फिल्डिींग' लावत असतात.

मंत्रीमंडळ विस्तारात सर्व जागा भरल्यामुळे पुन्हा विस्तार होणार नाही हे गृहीत धरून या संधीचे सोने करण्यासाठी या अधिकारी कर्मचारी यांनी राजकीय, सामाजिक तसेच कौटुबिक नेटवर्कचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com