पद लहान...समज महान; ईदसाठी साठविलेले पाच हजार रुपये शिपायाने दिले पूरग्रस्तांना

बकरी ईद साजरी करण्यासाठी साठविलेली पाच हजाराची पुंजी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यालयातील आझाद इब्राहिम शेख या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला पूरग्रस्तांना दिली. पद लहान असूनही दाखविलेल्या या मोठ्या समजदारीबद्दल त्यांचे मोठे कौतूक होत आहे.
पद लहान...समज महान; ईदसाठी साठविलेले पाच हजार रुपये शिपायाने दिले पूरग्रस्तांना

पिंपरी : बकरी ईद साजरी करण्यासाठी साठविलेली पाच हजाराची पुंजी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यालयातील आझाद इब्राहिम शेख या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला पूरग्रस्तांना दिली. पद लहान असूनही दाखविलेल्या या मोठ्या समजदारीबद्दल त्यांचे मोठे कौतूक होत आहे. 

शेख हे भाजप कार्यालयात गेल्या तीन वर्षापासून शिपाई म्हणून काम करीत आहेत. ईदसाठी त्यांनी पाच हजार रुपये जमा केले होते. ते त्यांनी आज पूरग्र्स्तांना दिले. त्यांच्या या दातृत्वाच्या भावनेने एक आदर्श उभा केल्याची भावना भाजप कार्यालयातून व्यक्त करण्यात आली.महापूरामुळे सांगली व कोल्हापूर येथील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनासह अनेक संस्था आणि संघटना सरसावल्या आहेत. नागरिकांनी सढळ हाताने शक्य ती मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत शेख यांनी आपला खारीचा वाटा उचचला. 

त्यांनी ईद साजरी करण्यासाठी काटकसर करून हे पैसे साठविले होते. मात्र, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी हे पैसे देऊन त्यांनी समाजभान दाखविले आहे. शेख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम दिली आहे. भाजपाच्या  शहर कार्यालयात भाजपाचे शहर सरचिटणीस तथा शहर प्रवक्ते अमोल थोरात यांच्याकडे त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. यावेळी दुसरे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ आणि नगरसेवक शितल शिंदे उपस्थित होते.

थोरात यावेळी म्हणाले की, शेख यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. आपले घर चालविताना कसरत होत असतानाही त्यांनी काटकसर करून बकरी ईद साजरी करण्यासाठी पैसे जमविले होते. ते पैसे त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिले असून त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. इतरांनीही अशाप्रकारे पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com