Offence Registered Against Sugar Factory MD | Sarkarnama

राज्यमंत्र्यांच्या कारखान्याच्या एमडीवर गुन्हा; संचारबंदीचे उल्लंधन

सरकारनामा वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

लॉकडाऊन असताना संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोल्हापूर : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असतानाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हातकणंगले तालुक्‍यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊस तोडणी हंगाम पूर्ण झाल्याने लेटर पॅडवर गावी जाण्यास परवानगी देवून संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे उपसंचालक(साखर) एस. एन. जाधव यांनी हातकणंगले पोलीसांत फिर्याद दिली. त्यानुसार श्री. डिग्रजे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

साखर आयुक्तांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनाचे नागरीकांतून कौतुक होत आहे. या कारखान्याचे सर्वेसर्वा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आहेत, तरीही ही प्रशासनाने हे टोकाचे पाऊल उचलले याची चर्चा सुरू आहे. 

''कोरोना विषाणू (कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक वगळून अन्य वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही शरद सहकारी साखर कारखाना लि. चे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी कारखान्याच्या लेटर पॅडवर मजूर रामकिसन भगवान वायनसे (रा. नामेवारी ता. केज जि. बीड) हे कारखान्याकडील गळीत हंगाम - ऊस तोडणी वाहतूक पूर्ण झाल्याने गावी जात आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना जाण्यासाठी अडथळा करु नये, सोडण्यात यावे. अशा आशयाचे पत्र देवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.'' असे या फिर्यादीत म्हटले आहे. 

या प्रकरणी श्री.डिग्रजे यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक भावड हे तपास करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख