गुन्हा दाखल झाल्याने मंगलदास बांदल यांच्या वाटेत काटेच काटे! 

गुन्हा दाखल झाल्याने मंगलदास बांदल यांच्या वाटेत काटेच काटे! 

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व विद्यमान सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, या शिरूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांवर फसवणूक व बेकायदा सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने पक्षाची बदनामी होत असून, या दोन्ही नेत्यांविरूद्ध पोलिस पुढे काय कारवाई करणार यातून पक्षासमोरील अडचणी भविष्यात आणखी वाढत जाण्याची शक्‍यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी संपूर्ण मतदार संघात सभांचे फड गाजवणाऱ्या मंगलदास बांदल यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपद दिल्याने त्यांची राजकीय प्रतिमा उंचावली होती. त्यातूनच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी शड्डू ठोकले होते. शिरूर - हवेली मतदार संघातील "राष्ट्रवादी' च्या प्रमुख इच्छुकांत त्यांचे नाव घेतले जात होते. परंतु, जमीन खरेदीविषयक व्यवहारातील फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या भावी "आमदार'कीच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्‍यात आणण्याच्या उद्देशानेच काही हितसंबंधियांनी त्यांच्या वाटेत हे काटे पेरले असल्याचीही तालुक्‍याच्या राजकीय पटलावर चर्चा आहे. परंतु, "आमचा नेता लई पॉवरफुल्ल असून, तो या सगळ्यांना पुरून उरेल', असा विश्‍वास बांदल समर्थक व्यक्त करीत आहेत. 

राजकीय कारकिर्दीमध्ये बरीच धांदल उडविणाऱ्या बांदल यांच्यावर यापूर्वीही एका महिलेला धमकाविल्याचा गुन्हा असून, पक्षांतर्गत विरोधकांनी यापूर्वीही त्याचे भांडवल करीत त्यांना अडचणीत आणण्याची संधी सोडलेली नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने विरोधकांबरोबरच; पक्षांतील हितसंबंधियांकडून याविषयी डंका पिटला जाण्याची शक्‍यता आहे.

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी व भावी संभाव्य बदनामी टाळण्यासाठी बांदल यांच्याकडून कायदेविषयक सल्ले घेतले जात असून, या प्रकरणातून सहिसलामत बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न चालू असल्याचे समजते. पुढील राजकीय रणसंग्रामात उडी घेण्यापूर्वी बांदल यांना या अग्निपरीक्षेच्या दिव्यातून जावे लागणार असल्याने बांदल समर्थक चिंतेत आहेत. 

शिरूर - न्हावरे गटातून, आमदारपूत्र राहुल पाचर्णे यांचा पराभव करून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले राजेंद्र जगदाळे पाटील यांच्यावर बेकायदा सावकारकी व धमकावल्याचा गुन्हा दाखल झाल्याने या गटातील राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली आहे. आमदारपूत्राला हरविल्याने जोमात असलेले जगदाळे पाटील समर्थक या गुन्ह्याने व संभाव्य कारवाईच्या चिंतेने कोमात गेल्याचे चित्र आहे. 

शिरूर - हवेलीच्या राजकीय पटलावर मंगलदास बांदल हे, माजी आमदार अशोक पवार यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक; तर जगदाळे पाटील हे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र, एकाच दिवशी दोघांवर गुन्हे दाखल झाल्याने अशोक पवार यांच्या तंबूत "कही खुशी - कही गम' असे चित्र निर्माण झाले आहे. खुद्द पवार यांनी याबाबत कुठलेही जाहीर भाष्य केलेले नसून, सध्यातरी त्यांनी "वेट ऍण्ड वॉच' ची भूमिका घेतली आहे.

जमीन खरेदीच्या व संबंधितांना धमकावल्याच्या आणखी एका प्रकरणात गेल्या शुक्रवारी (ता. 5) शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, चारच दिवसांत "राष्ट्रवादी' च्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, राजकीय पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आल्याच्या चर्चेने शिरूर तालुका व पुणे जिल्ह्याचे राजकीय पटल ढवळून निघाले आहे. या कारवाईने भारतीय जनता पक्षाच्या तंबूत मात्र आनंदाच्या उकळ्या फूटत असल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी, शिवसेना कोमात, भाजप जोमात' अशी चर्चाही तालुक्‍याच्या राजकीय पटलावर रंगू लागली आहे. 

``मंगलदास बांदल यांच्याविरूद्ध फसवणूकीचा; तर राजेंद्र जगदाळे यांच्याविरूद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या विषयाचा पोलिस कसून तपास करीत असून, या स्वतंत्र प्रकरणातील दोघांचाही सहभाग स्पष्ट झाल्यानेच गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांविरूद्ध आणखी कुणाच्या तक्रारी असतील किंवा फसवणूक, सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी न भिता पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात. संबंधितांना निश्‍चितच न्याय मिळवून दिला जाईल,`` असे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com