Odisha Ganjam District Collector Vijay Kulange Working Awesomely in Fight Against Corona | Sarkarnama

नगरचे भूमीपूत्र जिल्हाधिकारी कुलांगे यांचा 'विजय पॅटर्न' ओडिशात अव्वल (व्हिडिओ)

अॅड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 19 एप्रिल 2020

नगरचे भूमीपूत्र विजय कुलांगे यांच्या 'विजय पॅटर्न' ओडिशामध्ये नव्हे, तर जागतिक स्तरावर चर्चेचा ठरत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कुलांगे यांचा खास गौरव करीत त्यांचे काम इतर अधिकाऱ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. नगर करांसाठी आपल्या भूमिपुत्रांच्या काैतुकाची ही `सस्पेन्स स्टोरी` अभिमानास्पद आहे.

नगर : ओडिशामध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये आलेले तितली वादळ आणि त्यानंतर मे 2019 मध्ये दाखल झालेले फनी वादळ यांच्याशी गंजाम जिल्ह्याने मोठा सामना केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने या दोन्ही महाभयानक संकटामध्ये `झिरो कॅज्युअल्टी` ही बिरुदावली या जिल्ह्याने मिळविली. जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेल्या विविध अभिनव प्रतिबंधात्मक योजनांचा विजय पॅटर्न त्यावेळी केवळ ओडिशात नव्हे, तर देशात गाजला. कोरोनाचे  जागतिक संकटात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही. हे सर्व श्रेय जाते जिल्हाधिकाऱ्यांना. हे जिल्हाधिकारी दुसरे- तिसरे कोणी नसून एक जिगरबाज नगरी तरुण आहेत. विजय अमृता कुलांगे हे त्यांचे नाव. नगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा हे त्यांचे गाव.  

कुलांगे यांच्या 'विजय पॅटर्न' ओडिशामध्ये नव्हे, तर जागतिक स्तरावर चर्चेचा ठरत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कुलांगे यांचा खास गौरव करीत त्यांचे काम इतर अधिकाऱ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. नगर करांसाठी आपल्या भूमिपुत्रांच्या काैतुकाची ही `सस्पेन्स स्टोरी` अभिमानास्पद आहे.

देशभरात रचले मापदंड

देशातील पहिली जमावबंदी, यात्रा-जत्रा व सार्वजनिक कार्यक्रम बंदी, पहिला लाॅक डाऊन, पहिल्यांदा मास्कची सक्ती, थुंकण्यावर बंदी, मोटरसायकलवर एकट्याने प्रवास, मास्क नसेल तर शहरी भागात हजार रुपये व ग्रामीण भागात पाचशे रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड, असे विविध आदेश भारतात सर्वात आधी जारी करीत नवीन मापदंड त्यांनी रचले. परिणामी 40 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कुलांगे पुन्हा चर्चेत आले.

मुख्यमंत्री पटनायक यांचा जिल्हा

बंगालच्या उपसागराच्या शंभर किलोमीटरचा किनारा लाभलेल्या गंजम जिल्ह्यातील तब्बल बावीस तालुके, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा हा जिल्हा व नेहमीचा मतदारसंघही. त्यामुळे ओडिशाच्या राजकारणासह विविध बाबींसंदर्भात गंजाम जिल्हा कायम चर्चेत असतो. जागतिक पातळीवर कोरोनाचे थैमान सुरू झाले, त्यावेळी कुलांगे यांनी आपल्या जिल्ह्यात परदेशातून व इतर राज्यातून येणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन 15 मार्च 2020 रोजी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी केले. अशा प्रकारचा आदेश जारी होणारा हा देशातील पहिला जिल्हा ठरला. 

देशातील पहिला लाॅक डाऊन

जिल्ह्यातील पुरुषोत्तम तालुक्यातील तारातारिणी यात्रा प्रसिद्ध. यात्रेला दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक घेतात. जमावबंदी आदेशामुळे ही यात्रा झाली नाही. त्यानंतर हातात दंड घेऊन नाचण्याची पद्धत असलेल्या `दंड नाचे` महोत्सवालाही बंदी घातली. परिणामी जिल्ह्यात कुठेही गर्दी झाली नाही. आणि त्यामुळे कुणाच्या संसर्गाला चालना मिळू शकली नाही. दरम्यानच्या काळात ओडिशा राज्याने आपत्कालीन स्थिती घोषित केली. त्याच काळात तब्बल 730 भूमिपुत्र प्रदेशातून जिल्ह्यात आले. बाहेरच्या राज्यातूनही कामानिमित्त गेलेले तीस हजार लोक परतले. त्यात मुंबई, चेन्नई, तामिळनाडू येथे कामाला असलेल्या भरणा जास्त होता. 

देशाबाहेरून आलेल्या या मंडळींमुळे संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कुलंगे यांनी देशातील पहिला लाॅक डाऊन जिल्ह्यात सुरू केला तो 'जनता कर्फ्यू' च्या दिवशी म्हणजे 22 मार्चला. परराज्यात व परदेशातून आलेल्या सर्वांना सक्तीने होम केले. त्यांची दररोज अंगणवाडी सेविकांकडून हजेरी घेतली जात होती. तसेच सेल्फी काढून वरिष्ठांना पाठवायचे, असे सिस्टिमॅटिक डेली रिपोर्टिंग सुरू केले. दररोज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा आढावा सुरू केला. त्यातूनच कोरोना तपासणीसाठी कोणत्या केसेस निवडायच्या, याचा निर्णय झाला. 700 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. सर्व निगेटिव्ह निघाली.

1700 लोकांना कॅम्पमध्ये सुविधा

लाॅक डाऊनच्या काळात 1700 लोक विशाखापट्टनम येथून येऊन पुढच्या राज्यात चालले होते. त्यांना कॅम्पमध्ये जेवण, नाश्ता, टीव्ही, सर्वस्वी त्यांच्या देखरेखीत नोडल अधिकारी नेमले. विद्यार्थ्यांसाठी सरकारी पातळीवर विविध ऑनलाइन स्पर्धा घेत त्यांची व्यवस्था ठेवली. जिल्ह्यातील सर्व म्हणजे 530 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रत्येकी20 बेडचे अध्यावत व्यवस्था तयार केली.

स्वतः सायकलवर फिरले

टाटा उद्योगसमूहाच्या सह्याने 200 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल अल्पकाळात उभारले. जनतेला भाजी, धान्य, दूध, इतर अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करण्यात यश मिळवले. कुलांगे स्वतः सायकलवर फिरून कोरोनाबाबत जनजागृती करीत असून, त्यांचे गांभीर्य पटवून सांगत आहेत. कलेक्टर सायकलवर आल्याने लोकांना त्यांचे सांगणे पटत होते. परिणामी लोकसहभाग वाढण्यास मदत झाली. त्यामुळे लाॅक डाऊन, संचार बंदीची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकली. अख्ख्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. येत्या 20 एप्रिलला जिल्ह्यातील विकास कामे, उद्योग व तत्सम बाबींसंदर्भातील नियम पाळून सुरू करण्यात येणार असल्याचे कुलांगे यांनी `सरकारनामा` शी बोलताना सांगितले.

सामान्य कुटुंबात जन्म

'सायकलवाले कलेक्टर' विजय कुलांगे सन 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आयएएस सिलेक्शन होण्यापूर्वी कुलंगी यांनी नगर जिल्ह्यात जामखेड येथे तहसीलदार म्हणून बजावलेली कामगिरी प्रशासन व जनतेच्या लक्षात आहे. तत्पूर्वी त्यांनी विक्रीकर निरीक्षक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. त्याआधी राळेगण मसोबा येथील टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या वडिलांना हातभार लावत यांचे प्राथमिक शिक्षक झाले. या नोकरीवर त्यांनी घराला टेकू देत बहिणींची लग्ने केली. तहसीलदार झाल्यानंतर दुष्काळी परिस्थितीशी प्रशासकीय सामना करीत कुलांगे यांनी मोठ्या जिद्दीने रात्रीचा दिवस करीत युपीएससीचा अभ्यास केला. जिल्हाधिकारी झाले. 

सायकलवाले कलेक्टर

सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कुलांगे जिल्हाधिकारीपदाचा डामडौल न करता अनेकदा सायकलवर सफर करून जनतेशी संवाद साधतात. त्यामुळे गंजाम जिल्ह्यातच नव्हे, तर अख्ख्या ओडिशामध्ये ते 'सायकलवाले कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध आहेत. माध्यमे, राजकारणी, प्रशासनाबरोबरच सामान्यांमध्येही कुलांगे साधेपणा व तत्परतेच्या शिस्तीमुळे प्रसिद्ध आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख