अशोक चव्हाण यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले; आक्षेप, सुनावणीमुळे छाननी प्रक्रिया लांबली

नांदेड लोकसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीच्या वेळी बुधवारी (ता. २७) दोन उमेदवारांनी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध तीन आक्षेप नोंदविले होते. त्याची सुनावणी दुपारी तीन ते साडेसहा या वेळेत झाली. त्यावर बुधवारी रात्री साडेदहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल देत तीनही आक्षेप फेटाळले व अशोक चव्हाण यांचा अर्ज वैध ठरविला.
अशोक चव्हाण यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले; आक्षेप, सुनावणीमुळे छाननी प्रक्रिया लांबली

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीच्या वेळी बुधवारी (ता. २७) दोन उमेदवारांनी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध तीन आक्षेप नोंदविले होते. त्याची सुनावणी दुपारी तीन ते साडेसहा या वेळेत झाली. त्यावर बुधवारी रात्री साडेदहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल देत तीनही आक्षेप फेटाळले व अशोक चव्हाण यांचा अर्ज वैध ठरविला.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये अशोक चव्हाण (कॉंग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), प्रा. यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी) आणि अब्दुल समद (समाजवादी पार्टी) यांच्यासह इतर पक्ष व अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी (ता. २७) बचत भवन येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उमेदवारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आलेल्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली.

अर्जांच्या छाननीच्या वेळी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्जावर बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख अफजलोद्दीन अजीमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी तसेच दुसरे अपक्ष उमेदवार रवींद्र थोरात यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपावर दोन्ही बाजूंच्या उमेदवार, प्रतिनिधी आणि वकील यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जवळपास सायंकाळी साडेसहा वाजपर्यंत सुनावणी झाली आणि त्यानंतर रात्री साडेदहा वाजता निकाल जाहीर केला आणि तिन्ही आक्षेप फेटाळून लावले. तसेच अशोक चव्हाण यांचा कॉंग्रेसकडून केलेला अर्ज वैध ठरवला असल्याची माहितीही डोंगरे यांनी दिली.

हे होते आक्षेप......
कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावावर उज्ज्‍वल गॅस एजन्सी आहे. ही एजन्सी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांची असून त्यामध्ये भारत सरकारचा ५१ टक्के पेक्षा अधिकचा हिस्सा असल्याचे नमूद आहे. या कंपनीकडून सदरील एजन्सीला प्रति सिलेंडर गॅस वितरणासाठी पैशाच्या रूपाने कमिशन मिळते व आर्थिक मिळकत होते. जर कार्यालयाच्या संबंधाने आर्थिक मिळकत मिळणे योग्य आहे तर ते लाभपद आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी भारत सरकारच्या अखत्यारीखालील लाभपद (आॅफिस आॅफ प्रॉफिट) धारण केलेले आहे. आणि सदरील बाब ही संविधानाचे अनुच्छेद १०२ (एक) (अ) नुसार असल्यामुळे अशोक चव्हाण यांचे नामनिर्देशनपत्र नाकारण्यात यावे व नामंजूर करण्यात यावे, अशी मागणी अर्जदार रवींद्र थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी त्यांच्या दोन मुलींच्या अर्थिक उत्पन्नाची माहिती २०१४ मध्ये दिली होती आणि २०१९ मध्ये दिलेली नाही. तसेच २०१४ आणि २०१९ च्या शपथपत्रात बरेच बदल असल्याची तक्रारही करण्यात आली.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण
दरम्यान, कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, अशी व इतर माहिती सोशल मीडियावर दुपारी पाचनंतर फिरू लागली. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण यांना मुद्दामहून विरोधक त्रास देत आहेत इथंपासून ते चव्हाण यांना निवडणूक लढवायची नाही इथंपर्यंतच्या अफवा आणि चर्चा रंगल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समर्थक आणि विरोधकांची गर्दी सुरू झाली होती. एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशासनानेदेखील वातावरण गंभीर होऊ नये, याची दक्षता घेत महत्त्वाच्या ठिकाणी लगेचच पोलिस बंदोबस्त वाढवला. दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुनावणी घेऊन निकाल साडेनऊ वाजता जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि साडेदहा वाजता जाहीर केला. या दरम्यान, जवळपास चार - पाच तास सोशल मीडियावर बरेच मेसेज फिरल्यामुळे काय निर्णय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते आणि चर्चाही रंगली होती. अखेर साडेदहा वाजता कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण यांचा अर्ज वैध झाल्याचे जाहीर होताच पुन्हा एकदा कॉँग्रेस समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे जल्लोष साजरा केला.

हा तर चिखलीकर, शिंदे यांचा कट : अशोक चव्हाण
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘‘माझ्या विरोधात अचानक तक्रार कुणी केली असली तरी त्यामागचे खरे सूत्रधार भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे आहेत. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक लढविण्याऐवजी मला न्यायालयीन प्रक्रियेत कसे अडकवून ठेवता येईल, याचाच प्रयत्न केला. परंतु, जिल्ह्यातील सामान्य जनता ही डॉ. शंकरराव चव्हाण आणि कॉंग्रेस यांना मानणारी आहे. त्यामुळे असे कितीही अडथळे माझ्यासमोर आणले तरी माझ्यासोबत नांदेडकर जनता आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com