obc leaders initiative to cancel fir in maratha reservation agitaition | Sarkarnama

मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी ओबीसी नेत्याचा पुढाकार

उत्तम कुटे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

...

पिंपरी : आरे येथील वृक्षतोडी विरोधात आणि नाणार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला आहे. आता  मराठा आरक्षण आंदोलकांवर भाजप सरकारच्या राजवटीत दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी आता सरकारकडे करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेनंतर दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचे पत्र दिले.या पुढाकाराबद्दल पिंपरी-चिंचवडमधील मराठा समाजाच्या नेत्यांनी मुंडेंच्या मागणीचे स्वागत करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, आरे आणि नाणारनंतर कोरेगाव भीमा दंगंलीचे गुन्हे मागे घेण्याबाबत नवे राज्य सरकार सकारात्मक असल्याने ते मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेईल,असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्याजोडीने त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या ४४ तरुणांच्या कुटुंबांना आधार देणारा निर्णय घ्यावा,असे साकडेही ठाकरेंना घातले आहे.

राज्याच्या जडणघडणीत मराठा समाजाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरक्षण मागणीसाठी ५८ शिस्तबद्ध भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाची मागणी रास्त होती, हे न्यायालयाच्या आदेशाने सिद्धही झाले. आरक्षण मिळाल्याने या समाजाला न्याय मिळाला असला,तरी त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे तो पूर्ण नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, म्हणून ही मागणी केली आहे.असे मुंडे यांनी नमूद केले आहे.

नोकरी व शिक्षणासाठी ही आरक्षणाची मागणी व त्याकरिता आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्यापासूनच वंचित राहण्याची पाळी आली आहे. एवढेच नाही, तर या तरुणांची कुटुंबे तणावाखाली आहेत याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख