nwab malik criticize on bjp and book | Sarkarnama

भाजपवाले शिवाजी महाराजांना कुठल्या पातळीवर घेऊन चाललेत - नवाब मलीक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करणारे लेखक म्हणतात मी माफी मागणार नाही, भाजपचे एक माजी आमदार म्हणतात या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांची उंची वाढली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींचा उल्लेख आधुनिक शिवाजी असा करतात, यावरून भाजपवाले शिवाजी महाराजांना कुठल्या पातळीवर घेऊन जात आहे हे स्पष्ट होते.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करणारे लेखक म्हणतात मी माफी मागणार नाही, भाजपचे एक माजी आमदार म्हणतात या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांची उंची वाढली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींचा उल्लेख आधुनिक शिवाजी असा करतात, यावरून भाजपवाले शिवाजी महाराजांना कुठल्या पातळीवर घेऊन जात आहे हे स्पष्ट होते. हा वाद मिटवायचा असेल तर पुस्तकाचे लेखक गोयल यांनी ज्या ठिकाणी प्रकाशन केले तिथेच भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत येऊन पुस्तक मागे घेत आहोत असे जाहीर करून माफी मागितली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी आलेले नवाब मलीक यांनी पत्रकारांशी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तका संदर्भात तसेच उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. नवाब मलिक म्हणाले, नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापी तुलना होऊ शकत नाही. हे पुस्तक मागे घेऊन लेखकाने बिनर्शत माफी मागितली पाहिजे. जाणता राजा यावरून देखील उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. पण शरद पवार यांनी कधीही स्वःताला जाणता राजा म्हणवून घेतलेले नाही. जाणता राजा ही एक उपाधी आहे, ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेशी न्याय करत होते, तीच भूमिका शरद पवार यांची देखील राहिलेली आहे. म्हणून लोकांकडूनच त्यांचा जाणता राजा असा उल्लेख केला जातो. जाणता राजा म्हणजे आम्ही शिवाजी राजे आहोत असे कधीही पवारांनी सांगितलेले नाही असेही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नागरिकता देण्याचा अधिकार केंद्राचा ... 
नागरिकता बहाल करण्याचा कायदा किंवा अधिकार हा केंद्र सरकारच्या गृहविभागाचा आहे. राज्यांना याचा अधिकार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एनआरसी लागू होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, शरद पवार यांनी देखील हे स्पष्ट केले आहे. केरळ सरकारने काय केले ? याच्याशी आम्हाला काही देणघेणे नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे यावर निर्णय घेऊ असे देखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख