काय सांगता? कर्जत पालिका निवडणुकीत चिकन तसेच दारू पार्ट्यांच्या प्रमाणात घट!!

काय सांगता? कर्जत पालिका निवडणुकीत चिकन तसेच दारू पार्ट्यांच्या प्रमाणात घट!!

कर्जत : मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकांमध्ये जेवणावळी, दारूच्या पार्ट्या हमखास ठरलेल्याच. मात्र या वेळी कर्जत नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी अवास्तव खर्चाला फाटा देत थेट मतदारांशी संपर्क साधला आहे. त्यासाठी व्हॉट्‌सऍप, फेसबुक यांसह यू-ट्युबच्या मदतीने उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे कर्जत नगरपालिका निवडणुकीमध्ये चिकन; तसेच दारू पार्ट्यांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. त्यामुळे निवडणुकीनिमित्ताने व्यवसाय तेजीत असणाऱ्या मद्य आणि चिकन विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.


निवडणुकीच्या प्रचारामध्ये समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे यू-ट्युबद्वारे बातमीचे थेट प्रक्षेपण आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचता येत असल्याने अवास्तव खर्चासाठी उमेदवारांनी हात आखडता घेतला आहे. प्रचारादरम्यान काही उमेदवार महिला मतदारांना साड्या देत आहेत; तर काही घड्याळाचे वाटप करून त्याद्वारे मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. नऊ प्रभागात नगरसेवकपदासाठी 18 उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने जनसंपर्क कार्यालयेही उघडण्यात आली आहे. मात्र एकाही राजकीय पक्षाची सभा झालेली नाही. अनेक उमेदवार नवखे असून प्रचाराच्या रणनीतीचा त्यांच्यात अभाव दिसत आहे. 

निवडणुका जवळ आल्यावर दिवसभर राबणारे कार्यकर्ते; तसेच त्या-त्या प्रभागातील मतदारांसाठी उमेदवारांकडून चिकन भात, दारूच्या पार्ट्या दिल्या जातात. मात्र या वेळेस त्याचेही प्रमाण फारच अल्प असल्याने चिकन विक्रीच्या व्यवसायात कोणतीही वाढ झाली नाही अथवा फायदाही झालेला नाही, असे चिकन विक्रेता भाईजान यांनी सांगितले.

दारूची विक्री जैसे थे 

निवडणुकांमध्ये सर्वपक्षीयांकडून नेहमीच दारूच्या पार्ट्या दिल्या जातात. त्यामुळे दारूच्या विक्रीतही वाढ होते. मात्र कर्जत नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी खर्चाला हात आखडता घेतला असावा; त्यामुळे दारू पार्ट्या दिसून येत नाहीत. त्यामुळे दारूच्या मागणीत फारशी वाढ झालेली नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com