Now Revolt in PCMC Congress Too | Sarkarnama

पिंपरी चिंचवडमध्ये आता काँग्रेसमध्येही बंडाळी

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 मार्च 2017

"पालिका निवडणुकीत पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये एकही जागा न मिळाल्याने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शहराध्यक्षांऐवजी दुसरा अध्यक्ष देण्याची मागणी येत्या शुक्रवारी (ता.17) मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन करणार आहे''.
-निगार बारस्कर

पिंपरी - "राष्ट्रवादी'नंतर पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसमध्येही बंडाळी उफाळून आली असून पालिका निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्याऐवजी दुसरा निष्ठावान अध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सदस्या आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्याकडे या बंडाचे नेतृत्व असून त्यांनी साठे यांच्याऐवजी दुसरा अध्यक्ष देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यांच्यासह निवडक कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस पक्ष बचाव ही मोहीम उघडली आहे.

सध्याच्या युती सरकार अगोदर राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतील दोन्ही काँग्रेसमध्ये पालिका निवडणुकीत बिघाडी झाली. ती दोन्ही काँग्रेसमध्ये पालिका निवडणुकीनंतर सुरूच आहे. पराभवानंतर राष्ट्रवादीने आपल्या पालिका गटनेतेपदी योगेश बहल यांची नियुक्ती केली आहे. ती बहुतांश स्थानिक नगरसेवकांना मान्य नाही. बहल यांच्यामुळेच पराभव झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचा निर्णय 22 नगरसेवकांनी बैठक घेऊन नुकताच घेतला आहे.

तसेच बहल यांना बदलून तेथे दुसरा कोणीही नेता देण्यासाठी त्यांनी 20 मार्च ही डेडलाईन दिली आहे. राष्ट्रवादीतील हे बंड शमतो न शमते तोच आता ते कॉंग्रेसमध्येही उफाळून आले आहे.  एकेकाळी वैभवास असलेल्या सव्वाशे वर्ष जुन्या राष्ट्रीय पक्षाला एकही जागा उद्योगनगरीत न मिळाल्याने संतप्त झालेल्या पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांनी काल (ता.12) बारस्कर यांच्या शाहूनगर,चिंचवड येथील निवासस्थानी बैठक घेतली. ती दोन तास चालली. त्यात शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करून तेथे निष्ठावान कार्यकर्त्याची नेमणूक करावी,अशी मागणी करण्यात आली.

बैठकीच्या अध्यस्थानी पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे होते.पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेश संयोजक मनोज कांबळे, माजी नगरसेवक रामचंद्र माने तसेच प्रदीप पवार, सचिन कोंढरे, दिलीप पांढरकर,उमेश बनसोडे, निखिल भोईर, एस.टी. कांबळे, दिगंबर भालेराव, बाळू जगताप, अर्चना मिश्रा, राजन पिल्ले, मंगला मोहिते, मयूर काळभोर, सुनील डोईजड, दीपक जगताप, कमल श्रोत्री आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

शहर पक्षाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा व त्यांच्या चुकीचा धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. त्यामुळेच पक्षाला एकही जागा नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत न मिळाल्याने मोठी नामुष्की ओढवल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात पक्ष मजबूत करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

यासंदर्भात बारस्कर व कांबळे म्हणाले, "महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात कार्ड कमिटीला विश्वासात घेतले नाही. तसेच अडीचशे इच्छुक असताना फक्त सत्तरच उमेदवार दिले. त्यात जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.असे चुकीचे निर्णय आणि धोरणामुळे पक्षाचा पराभव झाला आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख