आता अवैध धंदेवाल्यांचे खरे नाही, नगरला दोन्ही अधिकारी कडक

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही धडक निर्णय घेवून नगरमधील निवडणुका शांततेत केल्या. कोरोनाचे मोठे संकट असताना स्वतः ठिकठिकाणी फिरून कारवाई केली.
आता अवैध धंदेवाल्यांचे खरे नाही, नगरला दोन्ही अधिकारी कडक

नगर ः कोणाही राजकीय नेत्यांचा मुलाहिजा न करता धडक कारवाई, तडकाफडकी निर्णय घेण्यात प्रसिद्ध असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे नगरला आहेत.

त्यांना जोडीला आता मुंबई शहराचे उपायुक्त निखिलेशकुमार सिंह हे नगरला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. त्यामुळे दोन्ही अधिकारी सारखेच मिळाले असल्याने बेकायदा व्यावसायिकांचे आता काही खरे नाही, अशीच चर्चा प्रशासनामध्ये सुरु झाली आहे.

नगरला नवीन पोलिस अधीक्षक म्हणून सिंह आज (गुरुवारी) रुजू होत आहेत. ते यापूर्वी मुंबई शहराचे उपायुक्त होते. बदली होऊन ते नगरला येत आहेत. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे सध्या हा प्रभारी पदभार आहे.

यापूर्वीचे पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला पुढील प्रशिक्षणासाठी गेल्याने त्यांची ही जागा गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त होती. आता सिंह यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कारण सिंह यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर मोठी कारवाई केली होती.

त्यांची इनकॅमेरा कारवाई राज्यभर गाजली होती. तसेच यवतमाळ, धुळे येथेही अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. तेथेही धडक कारवाई करून अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडली होती. 

गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरणार का

नवीन आलेले पोलिस अधीक्षक सिंह यांच्यापुढे नगरमधील गुन्हेगारीचे मोठे आव्हान आहे. नगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. तसेच राजकीयदृष्ट्या तो अग्रेसर आहे. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येथे चांगला अधिकारी असावा, असे प्रशासन व नागरिकांना वाटते.

यापूर्वी पोलिस अधीक्षक म्हणून विश्वास नांगरे, कृष्ण प्रकाश यांनी विशेष कारकीर्द गाजविली. बड्या राजकीय नेत्यांना बेड्या ठोकत त्यांना गजाआड करण्याचे काम केले. त्यामुळे पोलिस अधीक्षकांची ताकद काय असते, हे त्यांनी नागरिकांना दाखवून दिले होते. नगरमधील गुन्हेगारीमध्ये वाळुतस्करी, राजकीय लोकांचा हस्तक्षेप व अवैध धंदेवाल्यांकडून होणारी दहशत यांचा अधिक समावेश आहे.

यापूर्वी जिल्ह्यात वाळुतस्करांनी तहसीलदारांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस कर्मचाऱ्यालाही मारण्याचे प्रकार झाले आहेत. अनेकदा तलाठी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना हाणमार करण्याचे प्रकार जिल्ह्यात झाले आहेत. राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यातील गुंडगिरीला विरोध करायला अधिकारीही तितकाच तरबेज लागतो.

या वाळुतस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे काम नवीन अधीक्षक सिंह यांना करावे लागणार आहे. तसेच अवैध व्यावसायिकांना राजकीय नेत्यांचे असलेले बळ खच्चीकरण करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

कोरोना संकटाशी सामना

कोरोनाशी सामना करताना पोलिस व प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे, तसे मात्र होत नाही. नवीन आलेले अधीक्षक सिंह यांच्याकडून ही कारवाई जोरदार होण्याची अपेक्षा आहे.

शासनाने शहरे, खेडी बंदचे आदेश दिले असता व दारु विक्री पूर्ण बंद केली असतानाही जिल्ह्यात ठिकठिकाणी दारू विकली जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सिंह यांच्यापुढे हे मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com