now i am reading book at home shivraj patil says | Sarkarnama

वाचनात वेळ कसा जातो कळत नाही : शिवराज पाटील

बुधवार, 25 मार्च 2020

'कोरोना'चा फैलाव सध्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे. पण, हा फैलाव कमी व्हावा म्हणून केंद्र असेल किंवा राज्य सरकार योग्य ती पावले टाकत आहे. नागरिकांची काळजी घेत आहे. नागरिकांनीही घरी बसून सरकारला सहकार्य करावे - शिवराज पाटील, माजी राज्यपाल

लातूर : माझ्याकडे स्वतःची छोटी लायब्ररी आहे. भारतातील आणि परदेशातील अनेक लेखकांची वेगवेगळी पुस्तके माझ्याकडे आहेत. ही पुस्तके वाचताना अक्षरशः वेळ कसा निघून जातो, हे कळतसुद्धा नाही. अधूनमधून टीव्ही पाहतो. कुटुंबियांशी गप्पा मारतो... अशा शब्दांत माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी आपली दिनचर्या सांगितली.

'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. प्रत्येकाला घरातच बसून रहायचे आहे. या आदेशाचे पालन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

पण, सतत लोकांमध्ये वावरणाऱ्या राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी घरात बसून काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवराज पाटील यांच्याशी संवाद साधला.

शिवराज पाटील म्हणाले, 'कोरोना'चा फैलाव कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी पूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचे जाहीर केले आहे. संसर्ग वाढू नये म्हणून घेतलेला हा निर्णय आहे. या निर्णयाचे आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

घरातच बसून राहणे, हा एकमेव पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. कोरोना झालेल्यांवर उपचार करण्यासाठी सध्या औषध तयार झालेले नाही. त्यामुळे घरी राहणे, हीच स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासारखे आहे.

मीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून घरीच आहे. अजिबात घराबाहेर पडलो नाही. अतिमहत्वाची बैठक असेल तरच जातो. अन्यथा नाही. घरात बसून पुस्तके वाचतो. लेखनही सुरू आहे. काही वेळ टीव्ही पाहतो. कुंटुबियांशी गप्पा मारतो. यातच वेळ निघून जातो. वेळ कसा जाणार, हा प्रश्नच मला पडत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख