शिवबंधनातील धनराज महालेंना मदतीबाबत भाजपमध्ये साशंकता? 

शिवबंधनातील धनराज महालेंना मदतीबाबत भाजपमध्ये साशंकता? 

दिंडोरी : माजी आमदार धनराज महाले लोकसभेला घाईघाईत राष्ट्रवादीत आले. पराभूत होताच विधानसभेसाठी झटपट पक्ष सोडून शिवसेनेत गेले. आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात त्यांची लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार नरहरी झीरवाळ यांच्याशी आहे. या सर्व घडामोडींत भाजप हा तिसरा फॅक्‍टर निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस सोडून भाजपच्या प्रचारात गेलेल्या माजी आमदार रामदास चारोस्कर यांनाही निवडणूक लढवायची ची आहे. यामध्ये भाजपसाठी चारोस्कर जवळचे आहेत. त्यामुळे भाजपचा फॅक्‍टर महालेंसाठी किती अडचण करतो याची उत्सुकता आहे. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेली दोन टर्म राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नरहरी झीरवाळ आमदार आहेत. मतदारसंघातील कादवा साखर कारखाना, विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायती आणि बाजार समिती या सत्तास्थांनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. 

त्यामुळेच महाले यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार झीरवाळ निश्‍चिंत होते. आता ऐनवेळी महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना- भाजप युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यात महाले शिवसेनेचे उमेदवार असतील. 

अशा स्थितीत रामदास चारोस्कर अपक्ष उमेदवार असतील. अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे सख्य असल्याचे बोलले जाते. त्यांना लोकसभा निवडणुकीतच विधानसभेसाठी उमेदवारीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. आता युती झाल्यास भाजपचा पाठींबा शिवसेनेला मात्र तिसरा उमेदवार चारोस्कर यांना त्यांची सहानुभूती असेल.

युती न झाल्यास महाले, चारोस्कर आणि झीरवाळ अशी तिहेरी लढत होईल. या सर्व स्थितीत भाजप हा तिसरा फॅक्‍टर महाले यांची अडचण करणार. त्यामुळे शिवबंधनात गेलेल्या महाले यांच्या मदतीबाबत सध्या तरी भाजपमध्ये साशंकता असल्याची चर्चा आहे. 

महाले यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्वच कार्यकर्ते, नेते सध्या तरी शिवसेनेत परतल्याचा दावा केला जातो. विशेषतः माजी सभापती एकनाथ गायकवाड, विलास निरगुडे, प्रविण जाधव, जयराम डोखळे हे सध्या शिवसेनेत गेल्याचा दावा केला जातो. मात्र आदिवासी राखीव असलेल्या या मतदारसंघाच्या सामाजिक विभागणीत कोकणा समाज लक्षणीय आहे. आमदार झीरवाळ, माजी आमदार महाले दोघेही कोकणा समाजाचे आहेत. चारोस्कर कोळी समाजाचे आहेत.

यामध्ये मराठा आणि वंजारी समाज निर्णायक ठरत आला आहे. बहुसंख्य मराठा समाजाचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार असल्यास त्याला वंजारी समाजाचा पाठींबा मिळेल. नसल्यास हा समाज शक्‍यतो सत्तेबरोबर जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोकणा व कोळी समाजाच्या द्वंदात मराठा व वंजारी समाज निकालाचे गणित निश्‍चित करु शकतो. त्याचे काय परिणाम होतात याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com