Nobady wants that office on sixth floor of Mantralay | Sarkarnama

अंधश्रद्धा : मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन कोणत्याच मंत्र्याला का नकोय ?  

सिद्धेश्वर डुकरे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

 'ते'  दालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. मात्र कालांतराने अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुंबई :  मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील एका दालनाविषयी वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. ते दालन अपशकुनी मानले जात असल्याची राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा आहे . त्यामुळे अलीकडच्या काळात सहाव्या मजल्यावरील दालन नको रे बाबा अशी भावना दिसून येत आहे . 

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात सध्या  सहा मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी सहाव्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्यानंतर त्याचे नुतनीकरण करण्यात आले.

इमारतीच्या नुतनीकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारील दालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. मात्र कालांतराने अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. या सरकारला वर्ष - दीड वर्षाचा कालावधी होताच खडसे यांना राजीनामा दयावा लागला. 

यांच्यानंतर स्व. पांडूरंग फुडकर यांना कृषीमंत्री म्हणून हे दालन स्वीकारले होते  मात्र त्यांचे अकाली  निधन झाले .  

त्यानंतर हे दालन नवे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना देण्यात आले. त्यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत पराभव होवून तूर्त तरी ते सत्तेच्या राजकारणातून बाजूला पडले आहेत . 

त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येही सहाव्या  मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या शेजारील दालन नको अशीच भूमिका घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यमान परिस्थितीत मुख्य इमारतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सहाव्या  मजल्यावर दालन राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांचे दालन  विस्तारीत इमारतीतील सहाव्या मजल्यावर असेल .  

छगन भुजबळ यांना मुख्य इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर  दालन मिळेल . एकनाथ शिंदे यांना विस्तारीत इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आपले कार्यालय थाटावे लागेल .  मंत्री सुभाष देसाई यांचे कार्यालय पाचव्या मजल्यावर असेल .

कॉंग्रेसचे ज्येष्ठ  मंत्री बाळासाहेब थोरात यांना विस्तारीत इमारतीतील पहिल्या मजल्यावर दालन देण्यात येत आहे. आणि कॉंग्रेस मंत्री डॉ.नितीन राऊत यांना मुख्य इमारतीतील चौथ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख