#CoronaEfffect काय म्हणता? 92 वर्षात तिसऱ्यांदा पासपोर्ट, नोटांची छपाई झाली बंद!

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी विविध अभूतपूर्व निर्णय घेतले जात आहेत. यातील एक मोठा निर्णय म्हणजे आजपासून पासपोर्ट आणि नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे
No Passport Currency Printing in Nashik Security Press From Today
No Passport Currency Printing in Nashik Security Press From Today

नाशिक : कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी विविध अभूतपूर्व निर्णय घेतले जात आहेत. यातील एक मोठा निर्णय म्हणजे आजपासून पासपोर्ट आणि नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. ९२ वर्षाच्या इतिहासात आता तिसऱ्यांदा आजपासून ही छपाई बंद झाली आहे. नोटा व पासपोर्टची छपाई होत असल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध आहे.

येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय हे देशातील नवरत्न संस्थांसारखेच महत्वाचे संस्थान आहे. ब्रिटीशांनी १९२५ मध्ये सिक्‍युरिटी व १९२८ मध्ये नोट प्रेस सुरु केला. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या या संस्थेने तंत्रज्ञान. सामाजिक, आर्थिक बदल आत्मसात केले आहेत. कितीही अडचण, काहीही समस्या असली तरी येथील यंत्रांचा खडखडाट रात्रंदिवस सुरु असतो. मात्र कोरोना संसर्गाच्या जागतिक संकटाला सामोरे जातांना येथील छपाई आजपासून थांबविण्यात आली आहे. 

या सिक्‍युरिटी प्रेसमध्ये २२०० तर नोट प्रेसमध्ये १९०० कामगार आहेत. या कामगारांचे व्यवस्थापन, अंतर्गत कार्यपध्दती लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही दोन्ही मुद्रणालये येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मजदुर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी ही माहिती दिली. रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याचा आढावा व प्रतिसाद लक्षात घेऊन आणि राज्यात विविध उपाययोजना केल्या जात असल्याने त्याचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने कोरोना विरोधातील लढ्यात ही प्रमुख संस्थाही सहभागी झाली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अखंडपणे कार्यरत असलेल्या या संस्थेत अपवाद वगळता कधीच उत्पादन बंद झालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४९ मध्ये येथील अवमानजनक विवस्त्र झडतीच्या विरोधात संप झाला होता. १९७९ मध्ये बोनस मिळावा यासाठी देशव्यापी संपात हे कामगार सहभागी झाले होते. तेव्हा सलग तेवीस दिवस मुद्रणालय बंद होते. त्यानंतर मात्र अत्यावश्‍यक सेवा असल्याने हे मुद्रणालय कधीही बंद झालेले नव्हते. आज तिसऱ्यांदा कोरोना संसर्गाच्या विरोधातील लढ्यासाठी हे प्रेस बंद झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com