no one allowed to come on street in pune till morning 5 as per police order | Sarkarnama

होय, आता पुण्यात घराबाहेर पडता येणार नाही : पूर्णतः संचारबंदी #fightagainstcorona

पांडुरंग सरोदे
रविवार, 22 मार्च 2020

जनता कर्फ्यू संपल्यानंतर पुण्यात सायंकाळी पाचनंतर नागरिक रस्त्यावर आल्याने पोलिसही चक्रावले. आता कोणाही नागरिकाला पहाटे पाचपर्यंत घराबाहेर पडता येणार नाही. 

पुणे : पुणेकरांना आता पूर्णवेळ घरातच थांबावे लागणार आहे. त्यासाठी पोलिसांना खास आदेश लागू केला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरामध्ये 144 कलमाअंतर्गत संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हा आदेश काढला आहे. त्यामध्ये कोणत्याही कारणासाठी नागरीकांना शहरामध्ये फिरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, रविवारी शहरामध्ये "जनता कर्फ्यु'ला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, दिवसभर शहरामध्ये शांतता होती, मात्र कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी नागरीक सायंकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते. त्यात काहींनी ढोल वाजविले. काहींनी गरबा खेळला. वाहने बाहेर काढण्यात आली. त्यामुळे शहरात पुन्हा नागरिक गटागटाने काही ठिकाणी दिसून आले. या उत्साहामुळे जनता कर्फ्यूचा मूळ उद्देशच धोक्यात आला असता.  असा प्रकार पुन्हा घडू नये, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. 

या पार्श्‍वभूमीवर, यांनी रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे पाच या वेळेत नागरीकांनी बाहेर पडू नये, यासाठी फौजदारी दंड संहिता अंतर्गतच्या 144 कलम लागू केला. डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातील नागरीकांनी कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करण्यास, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे व रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली होती. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख