खासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी  - No Officer Turned up for Meeting Organised by MP Sadashiv Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या (दिशा) सभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली

नगर : जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या (दिशा) सभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. आता २१ मार्चला सभा होणार असून, सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

खासदार सदाशिव लोखंडे अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रभारी संचालक परीक्षित यादव आदी उपस्थित होते. रुग्णवाहिकेअभावी बाभूळवाडे येथील गरोदर महिलेच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार रुग्णवाहिका चालक व डॉक्‍टरवर काय कारवाई केली, याबाबत खासदार लोखंडे यांनी विचारणा केली. 

मात्र, माहिती देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे लोखंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत यादव यांना धारेवर धरले. बाह्यवळण रस्ता, उड्डाणपूल व नगर-शिर्डी मार्गाबाबत चर्चा झाली. मात्र, अधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने दोन्ही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस अनेक विभागप्रमुख गैरहजर होते. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्‍न एक महिन्यात मार्गी लागणार असल्याचे खासदार डॉ. विखे यांनी पत्रकारांना सांगितले. त्या आधी सभेमध्ये विखे यांनी, उड्डाणपुलासाठी उपोषण करावे लागेल, असे म्हटले होते.

१५० थाळ्यांच्या जेवणाचे काय

सभा तहकूब झाल्यानंतर जिल्हाभरातून आलेले अनेक अधिकारी व पदाधिकारी सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकाऱ्यांना १५० थाळ्या जेवणाचे काय करायचे, असा प्रश्‍न पडला. त्यांनी सभागृहात राहिलेल्या मोजक्‍याच लोकांना आग्रह करून जेवण दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख