No offence Registered in Malegaon for last two days | Sarkarnama

गुन्हेगारांना दहशत कोरोनाची; मालेगावच्या दहा पोलिस ठाण्यांत एकही गुन्हा नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना इफेक्‍ट की काय मंगळवारी (ता.२४) मालेगाव शहर व तालुक्‍यातील दहा पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एकही गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे पोलिसांना संचारबंदी, बंदोबस्तावर लक्ष केंद्रित करता आले

मालेगाव : हे शहर म्हणजे काही भागात मुंग्यासारखी माणसं, मोकळा रस्ता दिसेल तिथे वाहने घुसवणारे, नुसता धक्का लागला तरी मारामारीवर येणारे. त्यामुळे येथे थोडी नव्हे चक्क दहा पोलिस ठाणे आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात रोज चार-पाच गंभीर गुन्हे दाखल होतात. मात्र 'कोरोना'चा प्रभाव इथेही जाणवला. मंगळवारी, बुधवारी येथे असा एकही गुन्हाच दाखल झाला नाही. पोलिसांच्या दृष्टीने हे आश्‍चर्य आहे.

शहर व तालुक्‍यातील विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांत दोन खून, खुनाचा प्रयत्न, चार गोळीबाराच्या घटना घडल्या. बलात्कार, दुचाकी व सोनसाखळी चोरी, रस्ता लूट, घरफोडी हे प्रकार वेगळे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांचा छडा लावला. संशयितांना जेरबंद केले. मात्र येथील गुन्ह्यांच्या घटनांची सतत चर्चा असते. शहरात वाहतुकीचे नियम तर नाहीच आहे. मात्र, वाहनाचा जरासा धक्का लागला तरी हातघाईवर प्रकरण येते. 

रागाने पाहिले, चालकांना कोणी पुटपुटले, सिनेमाचे गाणे म्हटले, पान खाऊन पिचकारी मारली एव्हढेच काय कधी तरी घडलेली शाब्दीक चकमक यांचे पर्यावसान हाणामारी यात होण्यास वेळ लागत नाही. केवळ हात-पायांची मारामारी नव्हे तर मारामारीत चाकु, सुरे, वस्तरे चालवणे येथे नेहमीचेच असते. मात्र 'कोरोना'ने घरीच थांबण्याचे फर्मान निघाल्यावर शंभर टक्के नसले तरी बऱ्यापैकी नागरीक घरातच थांबू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणजेच वाद-विवाद कमी झाले. अन्‌ पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल करण्याची वेळ टळलेली दिसते.

कोरोना इफेक्‍ट की काय मंगळवारी (ता.२४) शहर व तालुक्‍यातील दहा पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एकही गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे पोलिसांना संचारबंदी, बंदोबस्तावर लक्ष केंद्रित करता आले. शहरवासीय रस्त्यावर कमी प्रमाणात आहेत. सगळे घरातच बसले, त्याचा हा कदाचित परिणाम असावा. आगामी काळात संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाल्यास नवल वाटायला नको. कारण गर्दी टाळा, घरात बसा, प्रशासनाला सहकार्य करा हे सांगण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल यांसह सर्वपक्षीय नेत्यांना शहरात फिरावे लागले. पोलिसांनी काहींना लाठीचा प्रसाद दिला. तेव्हा कुठे काही परिणाम झाला. त्यामुळे मंगळवारी शहरात पोलिस ठाण्यात नोंद होण्यासारखी एकही घटना घडली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख