No Finance Expert Ready to Work with Modi-Jaitley - Prithviraj Chavan | Sarkarnama

मोदी-जेटलींसोबत एकही अर्थतज्ञ काम करायला तयार नाही- पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 16 डिसेंबर 2018

औरंगाबाद येथे आयोजित परिसंवादात मार्गदर्शन केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राफेल, नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळ आणि नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणूका, त्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव यावर आपली परखड मते त्यांनी मांडली.

औरंगाबाद : "नोटाबंदी, जीएसटी सारख्या आत्मघातकी निर्णयामुळे बसलेल्या धक्‍यातून देश अजून सावरलेला नाही. त्यातच आरबीआय, सीबीआय आणि संसदे सारख्या लोकशाहीची ओळख असलेल्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सध्याचा सरकारकडून केला जातोय. एकंदरित देशाची लोकशाहीच यामुळे धोक्‍यात आल्याचा आरोप करतांनाच आजघडीला पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत जागतिक दर्जाचा एकही अर्थतज्ञ काम करायला तयार नाही," अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

औरंगाबाद येथे आयोजित परिसंवादात मार्गदर्शन केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राफेल, नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळ आणि नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणूका, त्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव यावर आपली परखड मते त्यांनी मांडली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "राफेल खरेदीतील 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार हाच आमचा आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असणार आहे. 'ना खाऊंगा ना खाने दुंगा..' म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीनेच राफेल विमान खरेदी व्यवहारात फ्रान्सच्या कंपनीला चाळीस हजार कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले. ते कशासाठी दिले याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल." 

सर्वोच्च न्यायालयाची सरकारने दिशाभूल केल्यामुळेच राफेल भ्रष्टाचार प्रकरणा विरोधातील याचिका फेटाळली गेली. पण त्यामुळे या सरकारला क्‍लीनचीट मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाला खोटी माहिती कुणी दिली याची चौकशी व्हायला पाहिजे, अशीही मागणी चव्हाण यांनी केली. 

रिझर्व्ह बॅंकेच्या गंगाजळीवर डोळा
''रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर तडकाफडकी राजीनामा देतात ही एवढी सोपी गोष्ट नाही. आरबीआय सारख्या वित्तीय संस्थेवर आंतराराष्ट्रीय स्तरावरचा विश्‍वास असायला हवा. आज केंद्र सरकारचा आरबीआयच्या साडेनऊ लाख कोटींवर देखील डोळा आहे. त्यातील साडेतीन लाख कोटी सरकार वापरायला घेऊ पाहत आहे. यावरूनच उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला असावा," अशी शंका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख