No Entry in Satara District Announces shekhar Singh | Sarkarnama

सातारा जिल्ह्यात प्रवेश बंदी, नियम मोडल्यास कडक कारवाई : शेखर सिंह

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 मार्च 2020

सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मुंबईहून साताऱ्यात येणाऱ्यांना कोणतीही मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न कोणी करेल त्यावर कडक कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केला असून आता संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मुंबईहून साताऱ्यात येणाऱ्यांना कोणतीही मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न कोणी करेल त्यावर कडक कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. गेल्या आठवडाभरात बंद असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच मुंबईहून अनेकजण सातारा जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. तसेच सध्या साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून काही कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांकडे असलेले ऊस तोडणी मजूर व कामगार यांना आता घराकडे जाण्याचे वेध लागले आहेत. पण हंगाम संपला तरी शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही जिल्ह्यातून बाहेर सोडले जाणार नाही. 

त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनांशी संपर्क करून त्यांच्याकडे असलेले ऊस तोडणी वाहतूक करणारे मजूर व कामगार यांना सोडू नये, अशा सूचना केल्या आहेत. तसेच या मजूरांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच थांबावे, त्यांची सर्व सोय कारखाना व्यवस्थापनाने करावी, अशी सूचना केली आहे. तरीही काही कामगार टोळ्या जिल्हा सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. अशा टोळ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सिंह यांनी दिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करून तेथे नाकाबंदी केली आहे. तरीही मुंबईहून साताऱ्यात येण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आजपासून कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असून त्यामुळे संसर्ग वाढण्याची भिती असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. जे या नियमाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सिंह यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख