पक्षांतराच्या शक्‍यतेत रखडलीय खासदारद्वयी गोडसे अन्‌ चव्हाणांची उमेदवारी

लोकसभेचा बिगुल वाजला. शिवसेना, भाजप युतीची घोषणा झाली. तरीही जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीतील विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा तर दूर, किमान संकेतही नाहीत. त्यामुळे राजकीय आघाडीवर सगळी सामसुम आहे.
Hemant Godse - Harishchandra Chavan
Hemant Godse - Harishchandra Chavan

नाशिक : लोकसभेचा बिगुल वाजला. शिवसेना, भाजप युतीची घोषणा झाली. तरीही जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीतील विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा तर दूर, किमान संकेतही नाहीत. त्यामुळे राजकीय आघाडीवर सगळी सामसुम आहे. उमेदवारीचे संकेत दिल्यास आपल्याच गोटातील नाराजांचे पक्षांतर होईल, अशी भिती युती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटते आहे. पक्षांतराच्या या चर्चेने दोन्ही खासदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

दिंडोरी मतदारसंघात भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण चौथ्यांदा तर नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. दोघेही विद्यमान खासदार असल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. अगदी पंधरा दिवसांपर्यंत या दोघांनी जोरदार 'होमवर्क' केला होता. हक्काची यंत्रणा निर्माण करण्यावर भर दिला होता.

मात्र दिंडोरीत शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यामागे अचानक सक्रीय झालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची व्युहरचना होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची हमखास उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा असलेल्या डॉ. भारती पवारांची उमेदवारी अनिश्‍चित झाली.

अशा स्थितीत भाजपच्या गोटात चौथ्यांदा उमेदवारी द्यावी की नाही यावर खल सुरु असलेल्या भाजपला मात्र आनंद झाला. भाजपला उमेदवारीची एक संधी अन्‌ भाजपला एक चव्हाण यांच्या उमेदवारीला पर्याय मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर केल्यास भारती पवार यांना भाजपमध्ये येण्यासाठी अनेक यंत्रणा सक्रीय आहेत. त्या पवार यांच्या उमेदवारीचा विचार करु शकतात. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष या मतदारसंघात काय भूमिका घेतो यालाही महत्व आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्यात किती यश येते यासाठी भाजपकडून हक्काचा उमेदवार असलेले खासदार चव्हाण यांना कोणतेही संकेत दिलेले नाहीत. सध्या तरी भाजपकडे पर्याय नसल्याने अनिच्छेने का होईना चव्हाण हेच उमेदवार मानले जातात. फक्त पक्षांतराच्या अपेक्षेने भाजप व भितीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारीचा निर्णय लांबवला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार गोडसे यांच्याविषयी पक्षातुनच विरोध आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना यंदाची निवडणूक ही शेवटची राजकीय संधी वाटते. त्यामुळे परस्पर उमेदवारीची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे विविध दरवाजे ठोठावले आहेत. मात्र त्याना कोणाकडूनच प्रतिसाद मिळालेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ किंवा माजी खासदार समीर भुजबळ यापैकी एक उमेदवार निश्‍चित आहे. अशा स्थितीत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास माजी आमदार माणिकराव कोकाटे, विजय करंजकर, शांतिगीरी महाराज, मराठा क्रांती मोर्चा यांच्यातुन एखादे नवे राजकीय समिकरण उदयास येण्याची भिती शिवसेनेला वाटते. त्याचा परिणाम म्हणजे निवडणुकीची घोषणा झाली, बिगुल वाजला तरीही दोन्ही विद्यमान खासदारांत मात्र हुरहुर कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com