अब्दुल सत्तार व भुमरे यांना सेनेत स्पर्धकच नाही...

अब्दुल सत्तार व भुमरे यांना सेनेत स्पर्धकच नाही...

औरंगाबादः शिवसेना-भाजप युती होणार अशी चर्चा एकीकडे सुरू असतांना मुंबईत आज जिल्ह्यातील भाजपकडे असलेल्या मतदारसंघात देखील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गेल्या महिन्यात भाजपने जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आज शिवसेनेकडून भाजपला जशास तसे उत्तर देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही? याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. निवडणुक आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते, अशावेळी युती झाली नाही, तर ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध नको म्हणून शिवसेनेने देखील स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती वाळूज येथे घेतल्या होत्या. त्यानंतर आज शिवसेनेने देखील सगळ्या मतदारसंघासाठी मुंबईत मुलाखती घेतल्या.

भुमरे, सत्तारांना स्पर्धक नाही

जिल्ह्यातील पैठण आणि सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे आमदार संदीपान भुमरे व माजी आमदार अब्दुल सत्तार यांना कुणी स्पर्धकच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदारसंघातून इतर कुणीच मुलाखतीला आले नाही. त्यामुळे भुमरे आणि सत्तार यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजते. तर कन्नड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आठ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये उदयसिंग राजपूत, केतन काजे, डॉ. अण्णा शिंदे, अवचित नाना वळवळे, सदाशिव पाटील, दिलीप मुठ्ठे, संजय मोटे आदींचा समावेश आहे.

कॉंग्रेसच्या कोल्हेनी दिली मुलाखत

शिवसेना प्रवेशासाठी इच्छूक असलेले कन्नड कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी देखील इच्छूक म्हणून मुलाखत दिली आहे. कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश आणि उमेदवारी मिळावी यासाठी मातोश्रीवर जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे. आता पक्षात अधिकृत प्रवेश न करता कोल्हे यांनी थेट मुंबई गाठत कन्नडमधून मुलाखत दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

गंगापूरमधून डोणगांवकर पती-पत्नी इच्छूक

गंगापूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. देवयानी डोणगांवकर, त्यांचे पती कृष्णापाटील डोणगांवकर यांनी उमेदवारी मागितली आहे. या शिवाय युवासेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने, दिनेश मुथा हे देखील इच्छूक आहेत. वैजापूर विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याचे दिसून आले. तालुका प्रमुख प्रा. रमेश बोरनारे यांच्यासह आसाराम रोठे, प्रकाश चव्हाण, डॉ. डोंगरे यांनी उमेदवारी मागितली आहे. विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश पवार, अशोक शिंदे आणि बाबासाहेब डांगे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

पूर्व-मध्यसाठी वैद्य, जंजाळ इच्छूक

शहरातील पूर्व-पश्‍चिम व मध्य मतदारसंघापैकी युतीमध्ये पुर्व भाजपकडे आहे. परंतु आजच्या मुलाखतीत शिवसेनेचे राजू वैद्य आणि राजेंद्र जंजाळ यांनी पुर्व आणि मध्य अशा दोन मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या. पुर्वमधून राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ यांच्यासह विश्‍वानथ स्वामी देखील इच्छूक आहेत. विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक मनोज गांगवे त्यांचे वडील बन्सीधर गांगवे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

भाजपने दावा केलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, बाळासाहेब थोरात, जयंवत ओक, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, यांच्यासह राजू वैद्य आणि राजेंद्र जंजाळ यांनी देखील उमेदवारीसाठी मुलाखत दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com