अडीच-अडीच वर्षाचा फार्मुला मान्य नाही: मा.गो. वैद्य 

अडीच-अडीच वर्षाचा फार्मुला मान्य नाही: मा.गो. वैद्य 

नागपूर : मुख्यमंत्री भाजपचाच होईल, ही बाब शिवसेनेने मान्य केल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्वाची खादी देण्याबाबत चर्चा होऊ 
शकते. पण अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा फार्मुला मला मान्य नाही आणि भाजपलाही मान्य होणार नाही, असे परखड मत ज्येष्ठ स्वयंसेवक आणि राष्ट्रीय 
स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले. 

काल मुख्यमंत्री फडणवीसांनी येथे संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. पण सत्तास्थापनेबाबत त्यांनी फडणवीसांना काहीही सांगितले नसणार, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

सामान्यपणे सरसंघचालक पक्षाला सत्तास्थापनेबाबत कुठलीही सुचना किंवा आदेश देत नसतात. कालच्या त्यांच्या भेटीत अयोध्या निकाल आणि त्यानंतर उद्‌भवणारी स्थिती याविषयावर चर्चा झाली असणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय समर्थपणे, शांतीने आणि सामंजस्याने स्वीकारावा या विषयावर उभयंतांची चर्चा झाली असण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली. 

शिवसेना जर भाजपसोबत आली नाही आणि तिढा सुटलाच नाही. तर भाजपने सरकार स्थापन करावे आणि विश्‍वासमत सादर करण्यास सज्ज व्हावे. विश्‍वासदर्शक ठराव नामंजूर झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्यानंतर सहा महीन्यानंतर पुन्हा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे.

पण आजघडीला महायुतीची सत्ता यावी ही अनेकांची इच्छा आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची तयारी दाखविल्यास त्यांना राज्यात काही महत्वाची खाती, केंद्रात दोन मंत्रीपदे, दोन राज्यपाल आणि विधानपरीषदेच्या काही जागा देण्यावर सकारात्मक चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले. 

दुसरा पर्याय शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे. यासाठी त्यांना कॉंग्रेसचा पाठींबा मिळवावा लागेल. या स्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनू शकतो. पण यामध्ये त्यांचे सहकारी पक्ष काय निर्णय घेतील, याचा अंदाज आता बांधणे योग्य ठरणार नाही. हे 
सांगताना त्यांनी कर्नाटकचा दाखला दिला. कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी आमदारांची संख्या कमी असतानादेखील कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन 
केल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्लीत काही नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी मुस्लीम नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल होते. यावेळी महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली नाही. तर अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येईल त्याबाबत चर्चा झाल्याचे मा.गो. वैद्य म्हणाले. 

नितीन गडकरी रेसमध्ये नाहीतच 
सत्तास्थापनेचा तिढा दिवसागणिक वाढतच आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत बोलताना वैद्य म्हणाले, की विधिमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे गडकरींचा महाराष्ट्रात येण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com