nitishkumar phone talking with navin patnaik | Sarkarnama

पवारांच्या आधी नितीशकुमारांचा फोन गेला आणि पटनाईक पटले! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

करुणानिधी यांच्या निधनामुळे द्रमुकचे सदस्य या निवडणुकीत सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधी आघाडीला आणखी एक झटका बसला आणि पीछेहाट झाली. उद्या किंवा परवा बहुधा संसदेला सुटी जाहीर केली जाण्याची शक्‍यता असल्यानेही या निवडणुकीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. अर्थात या सर्वच घडामोडींचा फायदा सत्तारूढ आघाडीला होत असल्याने दहा ऑगस्टला अधिवेशन समाप्तीपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे समजते. 

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या आगामी व संभाव्य निवडणुकीचे पारडे सत्तारूढ भाजप-आघाडीच्या बाजूने झुकल्याचे आज स्पष्ट झाले. बिजू जनता दलाने (बीजेडी) सत्तारूढ आघाडी पुरस्कृत संयुक्त जनता दलाचे उमेदवार हरिवंश यांना मतदानाचे आश्‍वासन दिल्यानंतर चित्र बदलल्याचे समजते. यामुळे विरोधी पक्षांतर्फे बहुधा कॉंग्रेसवरच प्रतीकात्मक निवडणूक लढण्याची पाळी येणार असल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवारांमध्ये हरिप्रसाद आणि कुमारी सेलजा यांची नावे चर्चेत आल्याचे समजले. 

राज्यसभेच्या उपसभापतिपदी विरोधी पक्षांना विजय मिळू न देण्यासाठी सत्तारूढ आघाडीने कंबर कसलेली होती. त्यानुसार त्यांनी संख्याबळही प्राप्त केले होते; परंतु बिजेडीच्या भूमिकेवर विजयाचा लंबक कोणत्या बाजूला वळतो यावर यश हेलकावे खात होते. माहीतगार गोटातून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना फोन करून हरिवंश यांना मतदान करण्याची विनंती केली. हरिवंश हे नितीशकुमार यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. पटनाईक यांनी त्यास होकार दिल्याचे समजते. 

आज दुपारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू असताना ही माहिती हाती आली; अन्यथा विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांना उमेदवार करण्याच्या हालचाली होत्या. त्यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेने मराठी असल्याच्या कारणाने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती असे समजते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पटनाईक यांचे निकटचे संबंध लक्षात घेता पवार बिजेडीची मतेही मिळवू शकतील असे मानले जात होते; परंतु नितीशकुमार यांनी आधीच पटनाईक यांना पटविल्याने विरोधी पक्षांच्या गळाला पटनाईक लागू शकले नाहीत. पटनाईक यांनी भूमिका घेतल्याने निवडणुकीचे पारडे पूर्णपणे व निर्णायकपणे सत्तारूढ भाजप आघाडीकडे झुकल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न उतरविण्याचे ठरवले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख