नितीन राऊतांनी चोवीस तासांत बंगला बदलला... - nitin raut changes bungalow in 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन राऊतांनी चोवीस तासांत बंगला बदलला...

राजू सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अजून तर खातेवाटप जाहीर व्हायचे आहे. तेव्हा काय होईल?

मुंबई : महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांना वाटप केलेल्या शासकीय बंगल्यावरून मानापमान नाट्य अजून सुरूच आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा `चित्रकूट` बंगला देण्यात आला होता. आता २४ तासांत पुन्हा नवीन जीआर काढत राऊत यांना `चित्रकूट` ऐवजी `पर्णकुटी` हा  शासकीय बंगला देण्यात आला आहे. 

राऊत यांना आधी दिलेला `चित्रकूट` बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला. राऊत यांना दिलेल्या आधीच्या  बंगल्यावरून राऊत नाराज होते. ती नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कळविली. त्यामुळे २४ तासांत पुन्हा हालचाली करण्यात आल्या. आर. आर. पाटील यांचे बराच काळ चित्रकूट या बंगल्यावर वास्तव्य होते.

दुसरीकडे मात्र काँग्रेस ज्येष्ठ नेते गट नेते बाळासाहेब थोरात अजून शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत. बंगल्यावरूनच एवढे मानापमान नाट्य घडत असेल तर खातेवाटपाच्या वेळी काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

राऊतांच्या स्वागतप्रसंगी चोरी!

नागपूर : नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे स्वागत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हिसका दाखवत पाकिट चोरी करीत जवळपास 55 हजार चोरले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथग्रहण केल्यानंतर प्रथमच नितीन राऊत शहरात दाखल होत होते. त्यामुळे सोमवारी 12.30 च्या सुमारास हजारो कार्यकर्ते विमानतळावर जमले होते. मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांचे स्वागत करीत होते. मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे जल्लोष सुरू होता. याचा फायदा घेऊन चोरट्याने कार्यकर्त्यांच्या खिशावर हात साफ केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख