nitin raut and bhima koregaon | Sarkarnama

बुद्धिवाद्यांना शहरी नक्षलवादी ठरविणे चुकीचे, चौकशी करून निर्दोषांना सोडणार : नितीन राऊत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नागपूर : कोरेगाव भीमाप्रकरणात अनेक विचारवंत, बुद्धिवाद्यांना शहरी नक्षलवादी ठरवून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सर्व माहिती मागविली असून यातल्या निर्दोषांना सोडण्यात येईल, असे माहिती ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रेस क्‍लब येथे पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, गरीब, झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविणे चुकीचे आहे. गरीब, आदिवासींसाठी लढा देणाऱ्यांना शहरी नक्षली ठरविणे योग्य नाही. याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. या प्रकरणाची पोलिसांकडून सर्व माहिती मागविण्यात आली आहे.

नागपूर : कोरेगाव भीमाप्रकरणात अनेक विचारवंत, बुद्धिवाद्यांना शहरी नक्षलवादी ठरवून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सर्व माहिती मागविली असून यातल्या निर्दोषांना सोडण्यात येईल, असे माहिती ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रेस क्‍लब येथे पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, गरीब, झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविणे चुकीचे आहे. गरीब, आदिवासींसाठी लढा देणाऱ्यांना शहरी नक्षली ठरविणे योग्य नाही. याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. या प्रकरणाची पोलिसांकडून सर्व माहिती मागविण्यात आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. जे दोषी नसतील त्यांना यातून बाहेर काढण्यात येईल, असे ते म्हणाले. 

जानेवारी 2018 मध्ये कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. याप्रकरणात काही विचारवंत, बुद्धिजीवी, वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दंगल घडविण्यात त्यांचा हात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. यातील अनेकांना जामीन मिळाला नाही. पोलिसांची ही कारवाई अयोग्य असल्याने वकिलांनीही याचा विरोध दर्शविला होता. दंगल घडविणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नसून निर्दोषांवर कारवाई केल्याचा आरोपही झाला आहे. तत्कालीन फडणवीस सरकारवर अनेक संघटना, संस्थांकडून निषेध नोंदविण्यात आला होता. 
फडणवीसांनी पळविले इंजिनिअरिंग कॉलेज 
आघाडीच्या कार्यकाळात उपराजधानीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर केले होते. हे कॉलेज उत्तर नागपूर येथे निर्माण होणार होते. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे कॉलेज पळवून आपल्या मतदारसंघात नेले. आयआयएम, विधी कॉलेजही आणण्यासाठी प्रयत्न केले. आयआयएमवरून तत्कालीनमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत मतभेद झाले. त्यांना ते आपल्या मतदारसंघात हवे होते. नंतर सरकार बदलले. वेद संस्थेला पाठपुरावा करण्यास सांगितले आणि ते आपल्याकडे आले, असेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्यासह केंद्रातील बडे मंत्री नागपूरचे होते, असे असतानाही नागपूरला एकही मोठा उद्योग आला नाही असा आरोप राऊत यांनी केला. 
बुद्धिस्ट थिम पार्क 
त्रिशाब्दी वर्षानिमित्त बुद्धिस्ट थिमची पार्कची संकल्पना मांडली होती. त्याला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. विदेशातील अनेक जण बुद्धिस्ट सेंटरला भेट देतात. जिल्ह्यातही अनेक सेंटर आहेत. याचा विकास झाल्यास पर्यटन वाढविण्यास मदत होईल. पर्यायाने उत्पन्नही मिळेल. फुटाळा तलावाजवळ गौतम बुद्ध यांची मोठी उंच मूर्ती उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकर कॉरिडॉरही तयार करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे आयएएस कोचिंग सेंटरला आधुनिक करून प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून दोन वर्षे करणार असल्याचेही राऊत म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख