nitin patil | Sarkarnama

कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ कॉंग्रेस कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात असतांनाच हर्षवर्धन जाधव कॉंग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांच्या बंडाचा फारसा विचार न करता सत्तार जाधव यांच्या बाजूने सध्या उभे राहिल्याचे दिसते.

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसमधून नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. इतर पक्षातील ताकदवान पदाधिकाऱ्याला हेरून ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षातील स्पर्धकाला डावलले जाते असा आजपर्यंतचा इतिहास आहे. भरतसिंग राजपूत, नामदेव पवार आणि आता हर्षवर्धन जाधव ही त्याची काही उदाहरणे म्हणावी लागतील. माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे पुत्र नितीन पाटील यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. पण त्यांच्या मार्गात शिवसेनेचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव हे अडथळा ठरण्याची शक्‍यता आहे. पक्षाने उमेदवारी देवो अगर न देवो, मी निवडणूक लढवणारच असा निर्धार नितीन पाटील यांनी केल्याची जोरदार चर्चा कन्नडमध्ये आहे. 

कन्नड तसा पारंपारिक कॉंग्रेसचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. स्व. रायभान जाधव, नितीन पाटील हे या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेले आहेत. नितीन पाटील यांनी 2014 मध्ये औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून पसरलेले संपर्काचे जाळे आणि सुरेश पाटील यांचे राजकीय वजन याचा फायदा नितीन पाटील यांना वेळोवेळी झालेला आहे. 

लोकसभा निवडणूकीच्या वेळी इच्छा नसतांना नितीन पाटील यांच्यावर उमेदवारी लादण्यात आल्याचे बोलले जाते. त्यावेळी पुढील विधानसभेत कन्नडमधून उमेदवारी देण्याचा शब्द कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाटील पिता-पुत्रांना दिला होता अशी देखील चर्चा होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नितीन पाटील यांनी मतदारसंघातील भेटीगाठी वाढवत तर सुरेश पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यामातून फिल्डींग लावली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

हर्षवर्धन यांच्यामुळे उमेदवारी धोक्‍यात 
शिवसेनेचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचे शिवसेनेशी फाटले आहे. मतदारसंघातील विकासकामांच्या उद्‌घाटनाला ते उघडपणे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड यांना बोलवत आहेत. त्यामुळे जाधव हे शरीराने आणि मनाने देखील कॉंग्रेसचे झाले आहेत. फक्त पक्षांतर्गत कायद्याच्या अडचणीमुळे त्यांच्या अधिकृत कॉंग्रेस प्रवेशाची घोषणा तेवढी बाकी आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा पुढील उमेदवार कोण असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. पण त्यामुळे नितीन पाटील यांच्या स्वप्नावर मात्र पाणी फिरले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नितीन पाटील अपक्ष लढण्याचा विचारात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ कॉंग्रेस कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात असतांनाच हर्षवर्धन जाधव कॉंग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांच्या बंडाचा फारसा विचार न करता सत्तार जाधव यांच्या बाजूने सध्या उभे राहिल्याचे दिसते. सहकारी संस्थांना साडेआठ कोटींचे कर्ज माफ केल्या प्रकरणी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अब्दुल सत्तार यांच्यासह काही संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून सुरेश पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यात वादावादी झाली होती, त्याचा परिणाम देखील नितीन पाटील यांना डावलण्यात झाला असावा अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख