सत्ता गेल्याचा फटका गडकरींनाही; ऐन भाषणात वीज गायब

केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात सर्व व्यवस्था नीट असणे आवश्यक असते. मात्र राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर वीज वितरण कंपनीही त्याकडे लक्ष देऊ शकली नाही का?
सत्ता गेल्याचा फटका गडकरींनाही; ऐन भाषणात वीज गायब

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा शुक्रवारचा कार्यक्रमही अगदी "कार्पोरेट इव्हेंट' सारखाच. या छोटेखानी पण शाही कार्यक्रमात आल्याकडच्या रस्ते आणि वाहतूक खात्याची कामगिरी मांडत गडकरींनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला. भाषण रंगणार इतक्‍यात गडकरींपुढच्या "माइक'चा आवाज गूल झाला. 

वीज गेल्याने मग जनरेटरचा शोध, तो "ऑन' करण्याचा खटाटोप पण; काही केल्या जनरेटर लगेचच सुरू झाला नाही. आमदार भीमराव तापकीर यांच्यासह इतर निमंत्रितांची धावपळ उडाली, अखेर पाच-सहा मिनिटांत तो सुरू झाला. तोपर्यंत माइकजवळच थांबवलेल्या गडकरींनी पुढच्या दीड मिनिटांत आपले भाषण आटोपले.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पूल ते कात्रज चौकापर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीणकर आणि सेवा रस्त्याच्या बांधणीचा शुभारंभ गडकरींच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) आंबेगाव येथील शिवसृष्टीबाहेरील आवारात झालेल्या कार्यक्रमाची जोरात तयार करण्यात आली होती. मोजक्‍या पाहुण्यांसाठी उभारलेल्या मांडवात रेडकार्पेटपासून सोफ्यांचीही सोय होती. मांडवात पाऊस ठेवताच "कार्पोरेट इव्हेंट'चा फील आला.

हा कार्यक्रम दुपारी एक वाजता असल्याने त्याआधीच लोकांनी गर्दी केली होती. मात्र, गडकरींचे आगमन पावणेतीन वाजण्याच्या सुमारास झाले. ते आधी शिवसृष्टी पाहण्यासाठी गेले. त्यानंतर व्यासपीठावर आले मात्र, आधीच लांबलेल्या कार्यक्रमात पुन्हा स्वागत-सत्कारांनी बराच वेळ घालवला. "आता सत्कार थांबवाच' अशी सूचना आयोजकांनी केली. तेव्हा सत्कारांची मालिका थांबली.

त्यानंतर गडकरींचे भाषण सुरू झाले, उपस्थितांची नावे घेऊन त्यांनी शिवसृष्टीचे कौतुक केले. कार्यक्रमाबाबत बोलायला सुरवात केली आणि त्या ठिकाणची "लाइट' गेली. काही क्षणांत जनरेटर सुरू होण्याची आशा खोटी ठरली. माइकविना आपला आवाज लोकांपर्यंत पोचणार नसल्याच्या शक्‍यतेने गडकरींनीही आपले भाषण तोपर्यंत थांबविले होते. त्यानंतर पाच मिनिटांनी जनरेटर ऑन झाला, पण मोजकेच बोलून गडकरींनी आपल्यापुढचा माइक "ऑफ' केला आणि भाषणातून रजा घेतली. सत्ता गेल्यानंतर नेत्यांवर काय वेळ येते, याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com