Nitin Gadkari & Sanjay Dhotre lead in votes percentage | Sarkarnama

नितीन गडकरी 55.67 टक्‍के मते घेऊन बनले विदर्भाचे  'मतसम्राट'

चंद्रशेखर महाजन
शनिवार, 25 मे 2019

यवतमाळ-वाशीममध्ये भावना गवळी यांच्या झोळीत 5 लाख 42 हजार 98 मते मतदारांनी टाकलीत. मतांची टक्‍केवारी 46.17 आहे.

नागपूर:  ' रोडकरी' म्हणून संपूर्ण देशात विकास कामातून ठसा उमटविणारे नितीन गडकरी यावेळी विदर्भाचे ' मतसम्राट' झाले आहेत. त्यांनी एकूण मतांच्या 55. 67 टक्‍के मते मिळवून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.

त्यांच्या पाठोपाठ वर्धा येथील भाजपचे खासदार रामदास तडस यांनी मते घेतली. त्यांनी 53.92 टक्‍के मते मिळाली आहेत. तर गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी विजयी उमेदवारांमध्ये सर्वांत कमी म्हणजेच 45.5 टक्‍के मते घेऊन विजय नोंदविला.

विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. दहांपैकी भाजप-शिवसेना युतीने 8 जागांवर विजय मिळवून विदर्भात एकहाती वर्चस्व असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.

यातील नितीन गडकरी यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्यावेळेस साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांनी ते विजयी झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. एवढेच नव्हेतर पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात होते.

 नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 6 लाख 6 हजार 221 ऐवढी मते मतदारांनी त्यांच्या झोळीत टाकली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी नाना पटोले यांना 4 लाख 44 हजार 212 मतांवर समाधान मानावे लागले. गडकरी हे दोन लाख 16 हजार 2 मतांनी विजयी झाले असून मतांची टक्‍केवारी 55. 67 आहे. दहाही मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा ती अधिक आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस आहेत. त्यांनी 53.92 टक्‍के मते घेतली. त्या खालोखाल भाजपचे भंडारा येथील उमेदवार सुनील मेंढे यांना मते मिळाली आहेत. त्यांनी 6 लाख 50 हजार 243 मते म्हणजे 52. 23 टक्‍के मते घेतली. चंद्रपूर येथील कॉंग्रेसचे उमेदवार बंडू धानोरकर यांना 45.18 टक्‍के मते मिळाली. अंत्यत कमी फरकाने ते विजयी झालेत. त्यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाली आहेत. 

बुलडाण्याचे शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव यांनी 46.59 टक्‍के मते घेतली आहेत. अकोल्याचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना 49. 53 टक्‍के मते मिळाली. अमरावतीच्या युवा स्वाभीमानीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 45.93 टक्‍के घेतली आहेत. त्यांना 5 लाख 10 हजार 947 मते मिळाली.

यवतमाळ-वाशीममध्ये भावना गवळी यांच्या झोळीत 5 लाख 42 हजार 98 मते मतदारांनी टाकलीत. मतांची टक्‍केवारी 46.17 आहे. तसेच रामटेक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले कृपाल तुमाने यांच्या मतदानाची टक्‍केवारी 49.9 असून त्यांना 5 लाख 97 हजार 126 मते मिळाली आहेत.

मतांतील मताधिक्‍यात धोत्रे पुढे
दोन उमेदवारांमधील मताधिक्‍यात अकोल्याचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे पुढे आहेत. त्यांना 5 लाख 54 हजार 444 ऐवढी मते मिळाली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी 2 लाख 78 हजार 848 ऐवढी मते घेतली. दोघांतील मतांचा फरक हा 2 लाख 75 हजार 596 ऐवढा आहे. तर सर्वात कमी फरकाने चंद्रपूरचे कॉंग्रेस उमेदवार बाळू धानोरकर निवडून आले आहेत. त्यांना 5 लाख 59 हजार 507 ऐवढी मते मिळाली. तर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी 5 हजार 14 हजार 744 ऐवढी मते घेतली आहे. 44 हजार 763 मतांनी बाळू धानोरकर विजयी झाले आहेत.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख