नाना पटोलेंनी आता स्वतःचा शब्द पाळावा आणि राजकीय संन्यास घ्यावा : नितीन गडकरी

नाना पटोलेंनी आता स्वतःचा शब्द पाळावा आणि राजकीय संन्यास घ्यावा : नितीन गडकरी

नागपूर : "नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन', असे बोलणाऱ्या नाना पटोलेंनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल, असे नितीन गडकरी आज `सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

नागपुरात पराभूत झाल्यानंतर पटोले आता विधानसभा निवडणुकीत कदाचित भंडाऱ्यातून नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतील. पण तेथेही जनता त्यांना `हात' देणार नाही. त्यामुळे त्यांनी आत्ताच राजकीय संन्यास घेणे बरे राहील, असा टोलाही त्यांनी हाणला.  मतमोजणीच्या आदल्याच दिवशी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी विजयाचा दावा केला होता, तो फोल ठरला. निवडणूक प्रचारादरम्यान पटोलेंनी अहंकारी, उद्धट आणि उर्मटपणाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. अशा उर्मट व्यक्तीला भंडाऱ्यातीलच काय कुठलीही जनता निवडून देणार नाही आणि त्यांचा उन्माद उतरवेल, असे ते म्हणाले.

2014 च्या निवडणुकीत बसपच्या उमेदवाराने 98 हजार मते घेतली होती. ती यावेळी कमी होऊन 30 हजारावर आली. अल्पसंख्यांकांची जास्तीत जास्त मते कॉंग्रेसला गेली. त्यामुळे यावेळी मतविभाजन झाले नाही. याचा अर्थ दलीत, मुस्लीम आणि ख्रिश्‍चन समुदायाचा विश्‍वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो, याची जाणीव झाली. हा विश्‍वास संपादन करण्याचा यापुढे पुरेपूर प्रयत्न केला जाईल. गेल्यावेळी 54 टक्के मते मिळाली होती. यावेळी तीत वाढ होऊन 57 टक्के झाली आहेत. त्यामुळे एक खरे आहे की, नागपुरातील सर्व पक्ष जरी एकत्र आले तरी 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते आमची आहेत.

नागपुरात गेल्या पाच वर्षात 27 हजार रोजगार उपलब्ध केले. पुढील वर्षापर्यंत रोजगार 50 हजारांपर्यंत वाढविण्यात येईल, असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला. यावर्षी महाराष्ट्रातला दुष्काळ हा शेवटचा दुष्काळ असेल. कारण पुढील पाच वर्षात नदीजोड प्रकल्प राबविला जाईल. नद्यांतून वाहून समुद्रात जाणारे पाणी रोखून संचय करण्यात येईल. जायकवाडी धरण 100 टक्के भरण्यात येईल. पाणी ही मोठी समस्या आहे. ती पुढच्या वर्षी उद्धभवू देणार नाही. त्यासाठी जलशक्ती हा नवीन विभाग तयार करण्यात येणार आहे. विदर्भाला बायोफ्युएल हब बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात पहील्या टप्प्यात भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्यातील ट्रकवाहतूक बायोसीएनजीवर करण्यात येईल. महानगरपालिकेच्या 450 बस सुद्धा बायोसीएनजीवर चालविण्यात येतील, असे ते म्हणाले. मोदींची सुप्त लाट होतीच हे या निकालाने स्पष्ट केल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com