nitin Gadkari has given a push to Pune ring road : Girish Bapat | Sarkarnama

गडकरींनी लक्ष घातले ,पुणे रिंगरोडच्या कामाला गती येणार :  गिरीश बापट

सरकारनामा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहर परिसरात 132कि.मी. चा बारा पदरी रिंग रोड बांधण्यात येणार आहे.

नवी दिल्ली  : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

श्री. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे सचिव युधविरसिंह मल्लीक आणि केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते .

पुणे रिंगरोडचे काम टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश श्री. गडकरी यांनी या बैठकीत दिले असून यामुळे रिंगरोडच्या कामाला गती येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकी नंतर दिली.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहर परिसरात 132कि.मी. चा बारा पदरी रिंग रोड बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व्हिस रोड बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रिंग रोडच्या माध्यमातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच सातारा व अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग पुण्यात न येता परस्पर शहराबाहेरच जोडण्यात येणार आहेत. 

 रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 3 हजार 675 कोटींचा खर्च होणार आहे. तर रिंग रोडच्या बांधकामासाठी 1 हजार 900 कोटींचा खर्च येणार आहे यासाठी केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. 

यास सकारात्मकता दर्शवत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे रिंग रोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे रिंगरोडच्या कामाला गती मिळेल असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख