ही मस्ती येते कुठून ?

लोकांच्या प्रश्‍नांवर प्रत्येक नेत्याने संयम सोडून हातघाईवर येण्याचे ठरविले. दडपशाही करून अंगावर रस्त्यावरील चिखल फेकून राज्यातील रस्ते गुळगुळीत होणार आहेका ? नीतेश राणेसाहेब ! आपण एका माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात. आमदार आहात हे कसे विसरता ! आपल्या पिताश्रींना आपण केलेल्या मस्तीविषयी शरमेने मान खाली घालावी लागते. याचे आपणास कसे काही वाटत नाही. इतकी मस्ती येते कोठून हा प्रश्‍न आज नक्कीच महाराष्ट्राला पडला असेल.
ही मस्ती येते कुठून ?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे फायरब्रॅंड पुत्र आणि आमदार नीतेश राणेंना झालंय तरी काय असा प्रश्‍न नक्कीच आज महाराष्ट्राला पडला असेल. अद्याप पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबईसह कोकणात रस्त्यांची आणि माणसांचीही दाणादाण उडाली आहे. रस्त्यात खडे की खड्यात रस्ते हे कळण्यास मार्ग नाही.

कोकणातील रस्त्यावरून गाडी चालविणे सोडाच चालणेही अवघड होऊन बसले आहे. धरण काय फुटते ! निष्पाप लोकांचे बळी जातात काय ? भिंती कोसळतात काय ! बिचारे राबणारे हात ढिगाऱ्याखाली जातात काय ? आणि श्‍वास कोंडतो काय ? या सगळ्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. तरीही संकटे येतात म्हणून घाबरून चालत नाही. संकटाचा सामना हा सरकार काय किंवा माणूस काय त्याला करावाच लागतो. 

तरीही प्रत्येकाने संयम सोडून हातघाईवर येण्याचे ठरविले. दडपशाही, मारहाण, धमकी देऊन अंगावर रस्त्यावरील चिखल फेकून जर का राज्यातील रस्ते गुळगुळीत झाले असते तर दररोज प्रत्येक अधिकाऱ्याला हाणायला काहीच हरकत नसावी नीतेश राणेसाहेब. आपण एका माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात. आमदार आहात हे आपण कसे विसरता ! आपल्या पिताश्रींना आपण केलेल्या मस्तीविषयी शरमेने मान खाली घालावी लागते. याचे आपणास कसे काही वाटत नाही. इतकी मस्ती येते कोठून हा प्रश्‍न आज नक्कीच महाराष्ट्राला पडला असेल. 

नारायण राणेसाहेबही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. त्यांचेही राजकारण आक्रमक राहिले आहे. ते जनतेच्या प्रश्‍नावर पेटून उठत. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही लोकांच्या प्रश्‍नांवर पेटून उठलात. आपणास संताप आला, चीड आली. अधिकाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे ही नीतेश राणेंसारख्या तरुण आमदाराची भावना असेल तर त्यामध्ये अजिबात चुकीचे असे काही नाही. पण, भ्रष्ट आणि काम चुकार अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने वठणीवर कदापी आणता येणार नाही हे प्रथम त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. 

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाताना आपण रस्त्याची दुर्दशा पाहिली. तेथे निसरडे रस्ते, चालणेही अवघड आहे हे आपल्या लक्षात आले. खरे पावसाळ्यापूर्वी आठ महिने असतात या महिन्यात त्यांच्यावर रस्ते दुरुस्तीची जबाबदारी आहे त्यांनी ती पार पाडली नाही. ऐन पावसाळ्यात रस्ते वाहून जातात. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडतात. लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

रस्ते आणि भ्रष्ट्राचार ही मोठी साखळी वर्षानुवर्षे सुरू आहे. ही साखळी आजपर्यंत कोणी तोडू शकली नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा मक्ता एकट्या नीतेश राणेंनी घेतलेला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खराब रस्त्याला केवळ एका अधिकाऱ्याला धरून चालणार नाही. चिखल फेकायचा असेल तर तो मंत्र्यांच्या अंगावर फेकण्याची धमकही त्यांनी दाखविली तर बरे होईल. 

आज कणकवली एका अधिकाऱ्याला धडा शिकविताना त्याची कॉलर धरता, तुमचे बगलबच्चे त्या अधिकाऱ्यावर चिखल फेकतात. त्यांना डांबून ठेवता ! हा अधिकार नीतेश राणेंना दिला कोणी हा प्रश्‍न आहे. तुम्ही अधिकाऱ्यांचा गळा धरण्यापेक्षा असेच वर्तन या खात्याच्या मंत्र्यांशी का नाही करीत. मंत्र्यांची कॉलर धरण्याची धमक तुमच्यात आहे का ? हा प्रश्‍नही यानिमित्ताने लोकांना पडल्याशिवाय राहणार नाही. 

आजच्या घटनेकडे पाहिले तर सर्वांत संताप आणणारे दृष्य म्हणजे पोलिस ठाण्यात नीतेश राणेंच्या समर्थकांनी केलेली अरेरावीची भाषा. जर या ठिकाणी एखादा सामान्य माणूस असता आणि त्याने याप्रकारे पोलिसांशी आवाज चढवून भाषा केली असती तर पोलिसांनी त्याला तेथेच लाठीचा प्रसाद देऊन तुडविले असते आणि तुरुंगात डांबले असते. एका हवालदाराला नीतेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने धमकी देत होते, पेटवा पेटवीची भाषा करीत होते ते नक्कीच शोभनीय नव्हते. 

एकवेळ नीतेश राणे आमदार आहेत हे ठीक आहेत त्यांचे समर्थक सरकारी कामात अडथळा आणत असताना त्यांच्या केसालाही हात लावण्याची पोलिसांची हिम्मत का झाली नाही. की पोलिसही राणेंच्या दादागिरीला घाबरले असे म्हणायचे ? हाच प्रश्‍न आहे. काहीही असो नीतेश राणेंचा धिंगाणा लोकांना आवडला असेल असे वाटत नाही. ही मस्ती येते कोठून ? हा प्रश्‍नही आहेच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com