संजय निरुपम शिवसेनेत असताना सेक्‍यूलर होते का ? 

कॉंग्रसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम हे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत होते की नव्हते ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आरती कोण ओवाळत होते ? जे शिवसेनेचे राज्यसभा सदस्य होते, नेते होते त्यांनी आज सेक्‍यूलरच्या गप्पा माराव्यात का ?
संजय निरुपम शिवसेनेत असताना सेक्‍यूलर होते का ? 

कॉग्रेसने शिवसेनेसोबत जाऊन युती करू नये.सरकार पडल्यावर कॉग्रेसला त्याचा मोठा फटका बसेल. कॉग्रेसला पुन्हा उभारी मिळणार नाही. कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राज्यातील आमदारांच्या दबावाखाली काम करत आहे.कॉग्रेस नेते सत्तेत बसण्यासाठी लाचार झाले आहे. शिवसेना कधी पर्यंत सेल्युलर म्हणून काम करणार.हे फार काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी कॉंग्रेसचे मुंबईतील एक नेते संजय निरुपम यांनी केली आहे. 

खरंतर निरुपम हे वादग्रस्त विधानासाठी कॉंग्रेसमध्येच नव्हे तर शिवसेनेत असतानाही प्रसिद्ध होते. निरुपमना राजकारणात संधी दिली ती मुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. जनसत्तामधून त्यांना थेट नागूजी सयाजीवाडीत आणले आणि हिंदी सामनाच्या संपादकपदी नियुक्त केले.

सामनात आल्यानंतर त्यांना बाळासाहेबांचा सहवास मिळाला. त्यांनी त्यांचा विश्वास निर्माण केला. शिवसेनेलाही उत्तर भारतीय चेहरा हवा होता. असा चेहरा घनश्‍याम दुबे यांच्या माध्यमातून मिळाला होता. दुबेंनाही शिवसेनेने राज्यसभेत पाठविले होते. मात्र त्यांचा काहीही फायदा झाला नाही. 

तेच काम शिवसेनेने पुन्हा केले. मुंबईतील उत्तर भारतीय व्होट बॅंकेवर डोळा ठेवून निरुपम यांना राज्यसभेवर धाडले. ते संपादकांचे खासदार बनले. मात्र नेहमीच उठाठेव करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या निरुपमांचे शिवसेना नेत्यांशीही सूत जुळणे शक्‍यच नव्हते. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून त्यांनी सत्ताधारी कॉंग्रेसचा हात धरला.

कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाने मुंबईचे अध्यक्ष केले आणि ते उत्तर मुंबईचे खासदारही बनले (मनसेने एकदा मते खाल्याने शिवसेना पडली होती). ते जोपर्यंत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष होते तोपर्यंत या पक्षाला काही मुंबईत चांगले दिवस आले नाहीत. कोणाशीही पटत नसलेले मुंबई कॉंग्रेसमध्ये जर कोणी नेता असेल तर निरुपम यांच्याकडे बोट दाखविले जाते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. म्हणजे पक्षाने कुठे तरी गांभीर्याने विचार करून नियुक्ती केलेली दिसते. 

मुंबईत कॉंग्रेसची ताकद होती. पण, ती शिवसेना-भाजपने खिळखिळी केली होती. तरीही मुंबईतील काही भागात कॉंग्रेस दिसते. ज्या शिवसेनेने कॉंग्रेसला पाण्यात पाहिले. कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी तर आपल्या तिखट वाणीने सोनिया गांधीवर जबरदस्त हल्लाबोल केला होता त्याच कॉंग्रेसबरोबर शिवसेना आणि शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी आली आहे. राज्यातील सत्ता समीकरण पार बदलून गेले आहे. शत्रू मित्र आणि मित्र शत्रू बनले आहेत. 

आज राज्यात या तीन पक्षाचे सरकार सत्तेवर येताना दिसत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. कॉंग्रेसही सत्तेत जाणार आहे हे निरुपम यांना पटलेले नाही. ते सेक्‍यूलरची भाषा करीत आहेत. मात्र कॉंग्रेसने ज्या मुस्लिम लिगबरोबर आघाडी केली होती हे ते विसरतात.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय विचार करूनच घेतला असेल की नाही हे निरुपम यांना कोण सांगणार ? ज्या उत्तर भारतीय मताबाबत निरुपम बोलता आहेत त्या यूपी आणि बिहारमध्ये कॉंग्रेस कुठे आहे.किती लोकसभा खासदार आहेत याचा विचार निरुपम यांनी केलेला दिसत नाही. 

यूपीत तर सोनिया गांधी या एकमेव खासदार आहेत हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. आज बिहारमध्ये तर कॉंग्रेसचा खासदार नाही. शिवसेना जर भाजपपासून दूर जात असेल, एनडीएतून बाहेर पडत असेल तर त्याचा फायदा कॉंग्रेस उठविल्याशिवाय राहणार नाही हे निरुपम यांना कोण सांगणार ?

संजय निरुपम यांच्यावर मनसे आणि शिवसेनेची मंडळी नेहमीच हल्लाबोल करतात. शरद पवारांनी तर त्यांना त्यांची जागा कुठे आहे हे दाखवून दिले होते. ते काही वर्षापूवी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षात होते की नाही ? आपण कुठे होतो आज कुठे आहोत याचं आत्मपरिक्षण करावं आणि मग सेक्‍यूलरच्या गप्पा माराव्यात ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com