आमचा लढा बारामतीकरांशी म्हणत रणजित निंबाळकर भाजपमध्ये.....

आमचा लढा बारामतीकरांशी म्हणत रणजित निंबाळकर भाजपमध्ये.....

मुंबई : सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी रणजितसिंह यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटणमधील त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना माढा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. 

सुरवातीला शिवसेनेत व नंतर कॉंग्रेसमध्ये आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन फेब्रुवारीला सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी तरूण तडफदार जिल्हाध्यक्ष मिळाल्याने आगामी काळात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त होईल, असे वातावरण निर्माण झाले होते.

`किसन वीर`चे अध्यक्ष व वाईचे कॉंग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणाऱ्या वाई, कोरेगाव, खंडाळा, सातारा या तालुक्‍यातील मदन भोसले समर्थकांना त्यांनी पदावरून दूर करत येथील तालुका कार्यकारिणी बरखास्त केली होती. रणजितसिंह यांनी धडाकेबाज काम करत असताना यावेळेस लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळणाऱ्या राष्ट्रवादीला धडा शिकविण्याची तयारी केली होती. पण मागील काही दिवसांपासून त्यांना भाजपकडून निमंत्रण आले होते. तसेच त्यांना माढा मतदारसंघातून उमदेवार देण्याबाबतही चर्चा झाली होती. केवळ माढातून उमेदवारी आणि राष्ट्रवादीकडून होणारी कॉंग्रेसची गळचेपी यातून संतप्त होऊन त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह यांची पत्नी जिजामाला निंबाळकर उपस्थित होते. अलिकडेच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते-पाटील यांची भाजप प्रवेशाबाबत बैठक झाली होती.

आमचा संघर्ष थेट बारामातीकरांशी! समानतेची वागणूक मिळाली नाही, याचे शल्य वाटते.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास करताना तुमचा पक्ष कोणता, हा प्रश्न कधीच विचारला नाही, असे रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. रणजितसिंह हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपूत्र असून विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक- निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत फलटणचे त्यांचे समर्थक नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर यांची माढासाठीची उमेदवारी कधी जाहिर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास माढामध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीचे संजय शिंदे विरूध्द भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com