` आमदार निलेश लंके हा अॅडजेस्टेबल पान्हा.. कोणत्याही नटाला बसतो`

nilesh lanke
nilesh lanke

नगर ः पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणातून विनोदी शैलीतून उपस्थितांची मने जिंकली. आपण आमदार कसे झालो, लोकांसाठी कसे दिवसरात्र पळतो, हे सांगताना मनमोकळा संवाद साधला.

निलेश लंके हा अॅडजेस्टेबल पान्हा आहे. कोणच्या पण नटाला बसतो, असे सांगताच लोकांमध्ये हशा पिकला. 
आमदार लंके यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी लोकांशी संवाद साधून लोकांना खळखलून हसविले. मला लोकांनी भरभरून प्रेम दिले असे सांगताना आमदार लंके म्हणाले, की मी वृद्ध व्यक्तिंच्याही गळ्यात हात घालून फिरतो. लहान पोरं तर माझ्यासोबत सेल्फी काढतात.  भगिनीही सेल्फी काढतात. मोबाईल त्याचा अन जाहिरात आपली, असे होते. मला किमान 25 हजार मतं या सेल्फीवाल्यांनीच दिले असतील, असे लंके यांनी सांगितले.

पुढील वेळी एक लाख क्राॅस करणार
लंके म्हणाले, की आमचं आता ठरलंय. पुढील वेळी मतांचा आकडा एक लाख क्राॅस करायचा. पण त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे. यापूर्वीही तुम्ही मला मोठी साथ दिली. मागील दहा वर्षांपूर्वी आमदार होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्या वेळी एखाद्या भविष्यकाराने सांगितले असते की तू ग्रामपंचायतीचा सदस्य होशील, तर तेही मला खरं वाटलं नसते. पण गेल्या नऊ वर्षांत लोकांनी मला डोक्यावर घेतलं. माझ्याबरोबरची मंडळी म्हणतात, अरे तू खरंच आमदार झाला की काय, तर रस्त्यावरील फलक पाहून वाटतं, की आपण खरोखरच आमदार झालो आहोत. यासाठी खूप संघर्ष करावा लागला. इतका संघर्ष कोणाच्याच नशिबात आला नसेल. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. मी काय दरोडे घालणारा आहे का? पण तसे गुन्हे दाखल झाले. या सर्व संघर्षाला तोंड देत असताना नाकीनऊ आले होते. माझ्या गाडीला पेट्रोल टाकण्याची  माझी परिस्थिती नव्हती, परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी मला तारले. माझ्या आईवडिलांनी, भावाने मोठी मदत केली. सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मला काहीच कमी पडू दिले नाही. पंपावर गाडी लावली, तर माझ्या आधी कुणीतरी कार्यकर्ता तेथे डिझेलचे पैसे भरत होता. हाॅटेलला गेलो, तर कुणीतरी सहकारी बिल देऊन मोकळा व्हायचा. नोकरी मेळावा, देवी दर्शन अशा उपक्रमांना निलेश लंके केवळ ब्रॅंड वापरला. परंतु सर्व आर्थिक मदत सहकाऱ्यांनी केली. असे लंके यांनी स्पष्ट केले.
 
`माझ्या फोटोला हार मात्र घालू नका`
सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. त्यात 101 गरीबांचे मोफत लग्न लावले. यासाठीही सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. प्रत्येकाने स्वतः अडचणीत असतानाही मी टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. मी कधीही हिशोब विचारला नाही. कारण मी त्यात काही वाटा टाकला नव्हता. हिशोबाला बसलो, की मी बाजूला होतो, कारण माझ्या त्याच्यात काहीच सहभाग नसतो. एकूणच कार्यकर्त्यांनी मला मोठी साथ दिली. मुंबईला दरवर्षी मेळावे घेतो. तेथे सुमारे अठरा हजार लोक जमतात. तेथेही लोकांचेच मोठे सहकार्य लाभते. माझे सहकारी परमेश्वरानंतर मला मानत असतात. कार्यकर्ते म्हणतात तुमचा फोटो देव्हाऱ्यात लावतो. परंतु मी सांगत असतो, त्याला हार मात्र घालू नका, असे लंके यांनी सांगताच हशा पिकला.

त्याने खाऊच्या पैशाचे घड्याळ दिले
निवडणुकीच्या दरम्यान लहान मुलांनी खाऊच्या डब्यातील पैसे आणून दिले. वाडेगव्हाण येथील सोनवणे सरांच्या मुलाने वर्षभर जमलेल्या खाऊच्या पैशातून मला घड्याळ दिले. एव्हढे प्रेम मला मिळाले. त्यामुळे मला या तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या माझ्या मायबाप जनतेला विकासाची गंगा पोचविण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन लंके यांनी केले.

विधानसभेत आमची दादा टोळी
विधानसभेत आम्ही आपले दुष्काळी आमदार शेजारी-शेजारी बसतो. तेथे तिन पिढ्यावाले एकमेकांशेजारी बसतात. आम्ही आपले वेगळे बसतो. तेथे आमची आमदारांची एक गॅंगच तयार झाली आहे. तिला दादा गॅंग म्हणतात, असे सांगून आमदार लंके यांनी विधानसभेतील चित्रही सांगून टाकले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com