व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोला - संभाजी निलंगेकरांचा अमित देशमुखांना टोला

 व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोला - संभाजी निलंगेकरांचा अमित देशमुखांना टोला

लातूर : देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे हे जनतेनेच ठरवले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडे आता मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते प्रचारामध्ये देशाच्या विकासावर चर्चा न करता आता आमच्यावर व्यक्तीगत टीका करीत आहेत. ही देशाची निवडणूक आहे. या नेत्यांनी साठ वर्षात काय केले ते सांगावे. व्यक्तिगत टीका टिप्पणीसाठी विधानसभेचे मैदान मोकळे आहे. त्यावेळेस मैदानात यावे, असा टोला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांना येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत मारला. 

दोन दिवसापूर्वी श्री. देशमुख यांनी निलंगा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत श्री. निलंगेकर यांच्यावर व्यक्तीगत टीका केली होती. त्याला श्री. निलंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणावर व्यक्तीगत टीका करणार नाही. राष्ट्रहीत, सुरक्षीतता, वैभवशाली भारत निर्माण करण्याचे श्री. मोदी यांचे स्वप्न आहे. विकासाचे मुद्दे घेवून आम्ही जनतेसमोर जात आहोत. लातूरमध्ये देशातील चौथा व राज्यातील पहिला रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना आम्ही आणला. हा कारखाना व त्या अनुषंगाने उभारले जाणरे इतर 
कारखान्यातून 50 हजार जणांना रोजगार मिळेल. साडे सात हजार कोटी रुपये खर्च करून सात राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. त्या पैकी पाच महामार्गाचे काम प्रकतीपथावर आहे. लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाला निधी प्राप्त झाला आहे, अशी कामे घेवून आम्ही जनतेत जात आहोत, असे श्री. निलंगेकर म्हणाले. 

कॉंग्रेस नेत्यांकडून मात्र विकासावर बोलण्याऐवजी आमच्यावर व्यक्तिगत टीका केली जात आहे. निलंग्यात माझ्यावर, उदगीरमध्ये सुधाकर भालेराव, अहमदपूरमध्ये विनायक पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. यावर आम्ही बोलावे अशी त्यांची अपेक्षा आहे. निवडणुकीत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही तसे करणार नाही. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर व्यक्तिगत राग असेल तर विधानसभेत निलंग्याचे मैदान मोकळे आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, मिलिंद पाटील, रमेश कराड, शिवसेनेचे संतोष सोमवंशी आदी उपस्थित होते. 

पंतप्रधानांच्या सभेची तयारी 
भारतीय जनता पक्षाचे लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे व शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ता. आठ एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. याची जय्यत तयारी सुरु आहे, अशी माहिती श्री. निलंगेकर यांनी यावेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com