Nilangekar once again trying to gain popularity | Sarkarnama

जनता उन्हात, पुढारी सावलीत असे चालणार नाही- निलंगेकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 मार्च 2017

जनतेची सहानुभूती असली तर निवडणुका जिंकणे सोपे जाते. संभाजी पाटील निलंगेकरांना याचा प्रत्यय एकदा आला आहे. त्यामुळे सहानुभूती मिळविण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय लातूरकरांना एका सिग्नल उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.

लातूर - जनतेची सहानुभूती मिळवण्याची एकही संधी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे दवडवत नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीत भावाला उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह केला तेव्हा "मी पदावर असेपर्यंत घरातील इतर कुणालाही पद किंवा उमेदवारी देणार नाही' अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याचा फायदा भाजपला जिल्हा परिषदेत झाला आणि स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली. आता त्यांचे लक्ष लातूर महापालिकेकडे लागले आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी चालून आलेली संधी निलंगेकरांनी पुन्हा एकदा कॅश केली.

शहराच्या चौकातील सिग्नलच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने "जनतेला उन्हात बसवून, पुढाऱ्यांना सावली यापुढे चालणार नाही, पुढील सगळ्या कार्यक्रमात लोकांसाठी देखील सावलीची व्यवस्था करा, एकवेळ पुढारी उन्हात बसले तरी चालतील पण, जनतेला सावलीत बसवा अशा," सूचनाच त्यांनी मनपा प्रशासन व कार्यकर्त्यांना दिल्या.

महापालिका निवडणुका जवळ आल्याने लातूर शहरात सध्या विविध विकास कामांच्या उद्‌घाटनचा सपाटा सुरु आहे. शनिवारी हुनमान चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलचे उद्घाटन संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपच्या मंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावेळी चौकात उभारण्यात आलेल्या शामियान्यातून संभाजी पाटील निलंगेकर यांनी छोटेखानी भाषण देखील केले. यावेळी व्यासपीठावर सावली तर भाषण ऐकणारे कार्यकर्ते व सर्वसामान्य लोक उन्हात उभे होते.

हे लक्षात येताच निलंगेकरांनी आयोजकांना खडसावत यापुढील प्रत्येक कार्यक्रमात जनतेसाठी देखील सावलीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. आता मंत्र्यांना जनतेची किती काळजी आहे हे बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न किती यशस्वी झाला हे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख