निलंगेकरांनी  मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा कायम  ठेवला 

सर्वात कमी वयाचा उदगीरचा नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर मिनी मंत्रालयात आलो. अडीच वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून खूप चांगले काम करता आले. स्वप्नातही नसताना पक्ष व पक्षाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. - राहुल केंद्रे, नूतन अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर.
Nilangekar-keeps-hold-on-zp
Nilangekar-keeps-hold-on-zp

लातूर : लातूरच्या महापौर व उपमहापौर निवडीत दोन सदस्यांची बंडखोरी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता. सहा) झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंडखोरी टाळण्यासाठी तगडी फिल्डिंग लावली. 


राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर सदस्यांना सांभाळण्याची जबाबदारी निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी यशस्वी पार पाडली. यामुळे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ करण्याचा आघाडीचा डाव उधळला आणि निलंगेकर बंधूंना मिनी मंत्रालय शाबूत ठेवण्यात यश आले.


यामुळे समुद्रातील वादळ असल्याचे समजून विरोधकांनी लावलेली फिल्डिंग धुळीस मिळाली व ते पेल्यातील वादळ निघाले. हे वादळ जागेवर शमवण्यात निलंगेकरांना यश आले. जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व असून सदस्यांचे मोठे संख्याबळ असतानाही वर्चस्वाला सुरुंग लागण्याची स्थिती होती. 


महापालिकेत दोन सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे बहुमत असताना कॉंग्रेसने सत्ता काबीज केली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी काटेकोर नियोजन केले. जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र केले. यात जिल्हाअंतर्गत बंडाळीचा परिणाम जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवर होऊ नये, यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून शिष्टाई केली. 


यातूनच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप सदस्यांची रविवारी (ता. पाच) बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यापुढे जाऊन सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी अरविंद पाटील निलंगेकर व लातूर ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड यांच्यावर सोपवली. दोघांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यामुळे भाजपला कथित बंडखोरी टाळून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. 


जिल्ह्यातील भाजप एकसंध असल्याचे दाखवून देताना कॉंग्रेसच्या गडालाही सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपने केला. यातूनच कॉंग्रेसचे तीन सदस्य गैरहजर राहिल्याची चर्चा घडून आली.

वादळ होते म्हणूनच...!

निवडीनंतर झालेल्या जिल्हा परिषदेतील सभेत अनेक सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सहकार्याची भावना ठेवण्याचा आग्रह केला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष पवार यांनी मुळावर घाव घालत 'तुमच्या समुद्रात वादळ दिसत होते म्हणून आम्हाला आशा वाटली होती,' असे जाहीर सांगितले.


 त्याला उत्तर देताना भाजपचे बस्वराज पाटील यांनी, तुम्हाला हे वादळ समुद्रातले वाटले. मात्र, पेल्यातील असल्याने ते पेल्यातच शांत करण्यासाठी आम्हाला जास्त कष्ट पडले नसल्याचा टोला लगावला. उमेदवारी मागे घेऊन बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्याबद्दल व सभागृहाची परंपरा जपल्याबद्दल भाजपच्या सदस्यांनी कॉंग्रेसचे अभिनंदन केले.तर यापुढील काळात पक्षभेद बाजूला ठेवून काम करण्याचा सल्ला देत चांगल्या कामाला सहकार्य व चुकीच्या कामाला विरोध करण्याचा मानसही विरोधी सदस्यांनी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com