रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी चंद्रकांतदादांचा फोन आला...

तुमची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची तळमळ यावर पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचे बारकाईने लक्ष असते हे पुन्हा एकादा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राज्यसभेवर संधी मिळाल्याने सिध्द झाले आहे.
newly elected mp bhagwat karad shares experience of candidature 
newly elected mp bhagwat karad shares experience of candidature 

औरंगाबादः राज्यसभेवर आपल्याला संधी दिली जाणार आहे, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 10 मार्च रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी फोन आला. डॉक्टर झोपले का? तुमचा बायोडाटा तातडीने मला पाठवा, असा निरोप त्यांनी मला दिला. तेव्हाही असे काही घडेल याची कल्पना नव्हती. पण 12 मार्च रोजी अधिकृतपणे माझी राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. राज्यसभेवरील संधी ही मला पक्षाने दिलेले सरप्राईजच होते, अशा शब्दांत राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेले भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या भाजपच्या तीन सदस्यांपैकी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित होती. तर उर्वरित एका जागेसाठी भाजपमधून अनेक इच्छूक होते. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, पुण्यातील संजय काकडे यांनी देखील आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न केले. पण अचानक डॉ. भागवत कराड यांची लॉटरी लागली.

राज्यसभेवर संधी मिळणार याची तुम्हाला कल्पना होती का? किंवा एकंदरित उमेदवारीचा प्रवास कसा होता, या प्रश्नावर डॉ. कराड म्हणाले, राज्यसभेसाठी आपल्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची कुठलीच कल्पना आपल्याला नव्हती. हे जर कुणाला सांगितले तर ते पटणार नाही, किंवा खरे वाटणार नाही. पण हेच सत्य आहे. 10 मार्च रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी मी घरी असतांना आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मला फोन आला. डॉक्टर झोपलात का? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. मी म्हणालो नाही साहेब, तेव्हा मला ताबडतोब तुमचा बायोडाटा पाठवून द्या असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.

माझा बायोडाटा एवढ्या रात्री कशाला हवा असेल असा विचार केला तेव्हा काही तरी घडतंय असे वाटायला लागले. घरी मी आणि माझा मुलगा होतो, बायोडाटाचा शोध घेतला पण तो सापडला नाही. काही दिवसांपुर्वी माझ्या गाडीवर हल्ला झाला होता, त्यात माझा फोन गेल्यामुळे त्यातला बायोडाटाही नाहीसा झाला होता. रात्री माझ्या पीएला फोन करून घरी बोलावून घेतले आणि दोन वाजेपर्यंत बायोडाटा तयार करून घेतला आणि तो प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला. 11 तारखेला सकाळी चंद्रकांतदादांच्या लोढा नावाच्या पीएंचा फोन आला. बायोडाटा ओपन होत नाहीये, पीडीएफ फाईल पाठवा असा त्यांचा नरोप मिळाला त्यानूसार पुन्हा बायोडाटा पाठवला.

योगायोगाने मी माझ्या कामासाठी मुंबईला विधानभवनात गेलो होतो. तिथे चंद्रकांत दादा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि राज्यसभेसाठी आम्ही तुमचा बायोडाटा पाठवल्याचे त्यांनी पहिल्यांदा मला सांगितले. निर्णय दिल्लीत होणार आहे, तेव्हा तुम्ही सध्या कुठे काही बोलू नका असे त्यांनी मला सांगितले, त्यानूसार मी गप्प राहिलो. 

दिल्लीहून माझ्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मला आमच्या दोन्ही नेत्यांनी फोनवरून माहिती दिली आणि त्याच दिवशी मी माझ्याकडे असलेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासह इतर शासकीय पदांचे राजीनामे मेलवर पाठवून ते मंजुर करून घेतले. राज्यसभेची उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्च रोजी अधिकृतपणे दुपारी 12 वाजता माझी उमेदवारी जाहीर झाल्याचे कराड यांनी सांगितले.

भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी म्हणून माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. 1999 मध्ये महापौर असतांना आता मला विधानसभेची संधी द्या अशी विनंती मी दिंवगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केली होती. 2009 मध्ये मला उमेदवारीही मिळाली पण मी पराभूत झालो. पण पक्षाचे काम अविरतपणे करत राहिलो. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या जबादाऱ्या माझ्यावर सोपवण्यात आल्या त्या मी नेटाने पार पाडल्या.

महापालिका, नगरपालिका निवडणुकीत नाशिक, धुळे, परभणी जिल्ह्यात मला काम करण्याची संधी देण्यात आली. मी सर्वांना सोबत घेऊन पक्षाला रिझल्ट दिला. तुमची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची तळमळ यावर पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचे बारकाईने लक्ष असते हे पुन्हा एकादा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राज्यसभेवर संधी मिळाल्याने सिध्द झाले आहे, अशा शब्दांत डॉ. कराड यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com